भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कॅप्टनच्या डोळ्याला लागला गंभीर मार, फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का
त्याच्या नेतृत्वाखालीच टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता
मुंबई: टीम इंडियाचा माजी कॅप्टन उन्मुक्त चंद सध्या चिंतेमध्ये आहे. ही चिंता त्याला खेळाची नाही, तर डोळ्याची आहे. उन्मुक्त चंदने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केलाय. ज्यात त्याचा डोळा सूजलेला दिसतो. फोटो पाहून त्याला गंभीर दुखापत झाल्याच स्पष्टपणे दिसून येतं. या फोटोसोबतच त्याने एक पोस्टही लिहीली आहे. टीम इंडियाने काही वर्षांपूर्वी त्याच्याच नेतृत्वाखाली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता.
उन्मुक्त चंद भारतीय क्रिकेटचा कधीच निरोप घेतलाय. सध्या तो अमेरिकेत क्रिकेट खेळतो. तो अमेरिकेच्या टी 20 लीगमध्ये खेळतो. त्याशिवाय ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगमध्येही खेळला आहे.
थोडक्यात बचावला
‘मी भाग्यवान आहे, मोठ्या संकटातून वाचलो’, असं उन्मुक्त चंदने आपल्या पोस्टमध्ये लिहीलं आहे. “खेळाडूसाठी कधीही मार्ग सोपा नसतो. अनेकदा तुम्ही जिंकून येता, तर काही वेळा हताश होता. काही वेळा तुम्ही घरी दुखापत घेऊन येता. मी देवाचा आभारी आहे, मोठ्या दुर्घटनेतून बचावलो. जोरदार खेळ पण सुरक्षित राहा. तुमच्या प्रार्थनांसाठी आभारी आहे” असं उन्मुक्त चंदने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलिय.
View this post on Instagram
दुसरा विराट कोहली म्हणायचे
अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून परतलेल्या उन्मुक्त चंदला दुसरा विराट कोहली म्हणायचे. पण उन्मुक्त चंद अपेक्षांच्या कसोटीवर यशस्वी ठरला नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली 2008 साली टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर दमदार प्रदर्शन करुन तो टीम इंडियात आला.
उन्मुक्त चंदकडूनही याच अपेक्षा होत्या. तो टीम इंडियासाठी खेळेल असं वाटलं होतं. पण असं झालं नाही. तो इंडिया ए पर्यंत पोहोचला. पण त्यापुढे जाऊ शकला नाही.
आयपीएलमध्ये चमक दाखवली नाही
उन्मुक्त चंद अंडर-19 वर्ल्ड कपनंतर आयपीएलमध्येही खेळला. पण तो खास कमाल दाखवू शकला नाही. दिल्ली डेयरडेविल्सने त्याला करारबद्ध केलं होतं. पण तो प्रभावी कामगिरी करु शकला नाही. दिल्लीशिवाय तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडूनही खेळला. तो 21 आयपीएल सामने खेळला. 15 च्या सरासरीने त्याने 300 धावा केल्या. फक्त एक हाफ सेंच्युरी त्याने झळकावली.