SA vs IND | सूर्याच्या शतकानंतर कुलदीपच्या 5 विकेट्स, टीम इंडिया विजयी, मालिका बरोबरीत
South Africa vs India 3rd T20i | दुसऱ्या टी 20 सामन्यात पराभव झाल्याने टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पिछाडीवर होती. मात्र करो या मरोच्या सामन्यात 106 धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं.
जोहान्सबर्ग | कॅप्टन सूर्यकुमार यादव याचं शतक, यशस्वी जयस्वाल याच्या अर्धशतकानंतर कुलदीप यादव याने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने तिसऱ्या आणि निर्णायक टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 106 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे दक्षिण आफ्रिकेने 13.5 ओव्हरमध्ये 95 धावांवर गुडघे टेकले. टीम इंडिया या विजयासह मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवण्यात यशस्वी ठरली.
मुकेश कुमार याने मॅथ्यू ब्रेट्झके याला 4 धावांवर आऊट करुन दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका दिला. तिथून टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतराने झटके देत ऑलआऊट केलं. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर याने सर्वाधिक 35 धावा केल्या. कॅप्टन एडन मारक्रम याने 25 धावांचं योगदान दिलं. तर डोनोव्हन फरेरा 12 रन्स करुन माघारी परतला. या तिघांव्यतिरिक्त 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर दोघे आले तसेच परत गेले. तर तरबेज शम्सी हा 1 रनवर नाबाद राहिला. टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जडेजा याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंह या दोघांना 1-1 विकेट मिळाली.
त्याआधी सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी केलेल्या तडाखेबंद खेळीमुळे टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 201 धावा करता आल्या. सूर्यकुमार यादव याने 100 धावांची शतकी खेळी केली. तर यशस्वी जयस्वाल याने 60 धावा केल्या. तिलक वर्मा 14 धावा करुन माघारी परतला. तर इतरांना विशेष काही करता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि लिझाद विल्यम्स या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर नांद्रे बर्गर आणि तबरेझ शम्सी या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
टीम इंडिया विजयी
Honours shared in the T20I series after India produced a sublime all-round performance in the final match against South Africa 🔥
📝 #SAvIND: https://t.co/ytix3VV4Cb pic.twitter.com/JjbbjmzHrd
— ICC (@ICC) December 14, 2023
दरम्यान टी 20 मालिकेनंतर उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला रविवारी 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी आणि नांद्रे बर्गर.