रोहितला ‘ती’ चूक महागात पडली; वर्ल्ड कपचा हिरो होण्याचं स्वप्न भंगलं?
रोहित शर्माने संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये आक्रमक फलंदाजी केली आहे. त्याने पॉवर प्लेमध्ये गोलंदाजांची चांगलीच पिसे काढली. अंतिम सामन्यापूर्वी त्याने चार डावात 50 हून अधिक धावा केल्या. तर इतर चार डावात 40 ते 50 धावा ठोकल्या होत्या. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात त्याच्याकडून कर्णधाराला साजेश्या बड्या खेळीची अपेक्षा होती. अंतिम सामना जिंकण्यासाठी त्याने संयम बाळगायला हवा होता. पण जे व्हायचं तेच झालं.
अहमदाबाद | 19 नोव्हेंबर 2023 : चेन्नईत 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप सामन्यात कर्णधार रोहित शर्मा सहा चेंडू खेळून खातंही न खोलता बाद झाला. त्यानंतर आज अहमदाबादमध्ये वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा रोहित शर्माला संधी आली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी सुरू केली. मात्र, स्फोटक खेळ करताना त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आक्रमक खेळण्याच्या नादात त्याने विकेट गमावली. त्याची ही चूक त्याला आजही महागात पडली आहे.
अहमदाबादमध्ये होणाऱ्या ऐतिहासिक सामन्याकडे प्रत्येकाची नजर खिळली होती. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून आधी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाला पहिली फलंदाजी मिळाल्याने भारतीय प्रेक्षक खूश झाले होते. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. शुभमन गिल झटपट बाद झाला. त्याने फक्त चार धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवत धावफलक हलता ठेवला.
आक्रमक फलंदाजी
संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने आक्रमक फलंदाजीवरच भर दिला. कधी फलंदाजीला येऊ तर कधी रनचेस करत पॉवर प्लेतच मोठी कामगिरी बजावली. त्यांनी या वर्ल्ड कपमध्ये केवळ चार सामन्यातच अर्ध शतकी खेळी केली. चार डावात जोरदार सुरुवात करूनही रोहित 40 ते 50 धावांवर बाद झाला. मात्र, त्या सामन्यांमध्ये रोहितची ही खेळी सुद्धा महत्त्वाची ठरली. त्यामुळे रोहित अंतिम सामन्यात संयमाने आणि आक्रमक खेळी करेल अशी आशा व्यक्त केली जात होती. त्याच्याकडून आजच्या सामन्यात मोठी कामगिरी होण्याची अपेक्षा होती.
लालच महागात पडली
10व्या ओव्हरमध्ये स्पिनर ग्लेन मॅक्सवेल याने जोरदार गोलंदाजी केली. रोहितने ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौकार लगावला. म्हणजे तीन चेंडूतच भारताने 10 धावा काढल्या होत्या. इंडियाची धावसंख्याही 76 झाली होती. दुसऱ्या बाजूने विराट कोहलीही फॉर्मात होता. तोही चांगल्या धावा कुटत होता. पॉवर प्लेला फक्त तीन चेंडू बाकी होते. त्यानंतर रोहित शर्मा क्रिजवर टिकून मोठी धावसंख्या करू शकला असता. पण तरीही रोहितला आक्रमकतेचा मोह आवरता आला नाही. षटकार आणि चौकार लगावल्यानंतर पुढचा चेंडूही त्यांनी हवेत मारला. मॅक्सवेलच्या चेंडूने लाईन बदलली होती आणि ट्रेव्हिस हेडने एक सनसनाटी कॅच घेऊन रोहितच्या मोठ्या खेळीचं स्वप्न भंग केलं. अंतिम सामन्यात हिरो होण्याची संधी रोहितने एका लालसे पायी गमावली.
संघाचंही नुकसान
रोहितने 31 चेंडूत 47 धावा केल्या. या वर्ल्ड कपमध्ये 40 ते 50 धावसंख्या असताना बाद होण्याची ही त्याची पाचवी वेळ आहे. चारवेळा 40 ते 50 धावसंख्येच्या आत आऊट होण्याचा अनुभव असताना रोहितने अंतिम सामन्यात संयमाने घ्यायला हवं होतं. त्याने थोडा संयम बाळगला असता तर तो मोठी धावसंख्या उभारू शकला असता. त्याचा टीम इंडियालाच फायदा झाला असता. पण असं झालं नाही. परिस्थिती बदलली. रोहित गेल्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये श्रेयस अय्यर बाद झाला. 76 धावांवर 1 गडी बाद असताना काही क्षणात 81 धावांवर तीन गडी बाद अशी स्थिती झाली.
टीम इंडियाच्या सांघिक खेळीमुळे टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचली. रोहितच्या नेतृत्वामुळेही हे शक्य झालं. पण आज कर्णधार म्हणून अंतिम सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण आक्रमक फलंदाजी करण्याची लालच त्याला महागात पडाली. चांगली सुरुवात केल्यानंतर त्याने स्वत:च माती केली. त्यामुळे त्याचं आणि संघाचंही मोठं नुकसान झालं.