भारताच्या श्रीलंका दौऱ्याची घोषणा, या दिवसापासून गौतम गंभीर उतरणार मैदानात
झिम्बाब्वे दौऱ्यानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया टी20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं आहे. या दौऱ्यात प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सनथ जयसूर्या यांचाही आमनासामना होणार आहे.
टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर असून टी20 मालिकेतील दोन सामने शिल्लक आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात 2-1 ने आघाडी घेतली आहे. 13 आणि 14 जुलैला शेवटचे दोन सामने पार पडतील. त्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतेल. टीम इंडिया अवघ्या 12 दिवसानंतर श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. कारण श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने जुलै ऑगस्टमध्ये होणाऱ्या टी20 आणि वनडे मालिकेची घोषणा केली आहे. टी20 मालिका 26 जुलैपासून सुरु होईल. तर वनडे मालिका 1 ऑगस्टपासून असणार आहे. टी20 मालिका पल्लेकेले येथे खेळवली जाईल. तर तीन सामन्यांची वनडे मालिका कोलंबोत होणार आहेत. गौतम गंभीर याची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने सनथ जयसूर्याची अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी एक काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे दोघंही डावखुरे असून पहिल्यांदाच प्रशिक्षकपदाची भूमिका बजावत आहेत.
रिपोर्टनुसार विराट कोहली आणि रोहित शर्मा या दौऱ्यावर जाणार नाहीत. तर जसप्रीत बुमराहला आराम दिला गेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हार्दिक पांड्याकडे टी20, तर केएल राहुलकडे वनडे संघाची धुरा असेल. टीम निवडीसाठी प्रशिक्षक गौतम गंभीर याची निवड समितीसोबत या आठवड्यात बैठक होईल. त्यानंतर संघाची घोषणा केली जाईल. दौऱ्याच्या दोन दिवस आधी गौतम गंभीर संघासोबत असेल असं बोललं जात आहे. या दौऱ्यापासून पुढची सर्व गणितं आखली जाणार आहेत. साडे तीन वर्षांच्या कालावधीत गौतम गंभीर चार मोठ्या स्पर्धांना सामोरं जायचं आहे. यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, टेस्ट चॅम्पियनशिप 2025, टी20 वर्ल्डकप 2026 आणि वनडे वर्ल्डकप 2027 चा समावेश आहे.
🚨 NEWS 🚨
Fixtures for the upcoming India tour of Sri Lanka announced! 📢#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/oBCZn0PlmK
— BCCI (@BCCI) July 11, 2024
टी20 मालिकेतील पहिला सामना 26 जुलैला, दुसरा सामना 27 जुलैला आणि तिसरा सामना 29 जुलैला होईल. भारतीय वेळेनुसार हे तिन्ही सामने संध्याकाळी 7 वाजता सुरु होतील. तर वनडे मालिकेतील पहिला सामना 1 ऑगस्टला असणार आहे. दुसरा सामना 4ऑगस्टला आणि तिसरा सामना 7 ऑगस्टला होणार आहे. वनडे सामने दुपारी 2.30 वाजता सुरु होतील.