U19 IND vs NEP : बीडच्या सचिन धसने ऐन मोक्याच्या क्षणी डाव सावरला, ठोकलं दमदार अर्धशतक
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर सिक्स स्पर्धेत भारत आणि नेपाळ यांच्यात सामना सुरु आहे. उपांत्य फेरीच्या दृष्टीने हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. पण आघाडीचे तीन फलंदाज झटपट बाद झाल्याने टीम इंडिया अडचणीत आली होती. अशावेळी बीडच्या सचिन धसने जबरदस्त कामगिरी करत टीम इंडियाचा डाव सावरला.
मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत भारत नेपाळ यांच्यात सामना सुरु आहे. सुपर सिक्स फेरीतील हा शेवटचा सामना असून उपांत्य फेरीसाठी महत्त्वाचा सामना आहे. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि कर्णधार उदय सहारन याने फलंदाजीचा निर्णय घेतला. या मैदानात दोन वेळा भारताने मोठी धावसंख्या उभारली होती. त्यामुळे या सामन्यातही तशाच खेळीची अपेक्षा होती. पण भारताचे आघाडीचे फलंदाजी झटपट बाद झाल्याने टीम इंडियावर दडपण आलं होतं. आदर्श सिंग, आर्शिन कुलकर्णी आणि प्रियांशु मोलिया झटपट बाद झाल्याने टीम इंडिया बॅकफूटवर आली होती. अवघ्या 62 धावांवर आघाडीचे तीन फलंदाज बाद झाले. त्यामुळे मधल्या फळीच्या उदय सहारन आणि सचिन धस यांच्यावर जबाबदारी आली होती. ही जबाबदारी ओळखून दोघांनी साजेशी खेळी केली. दोघांनी चौथ्या गड्यासाठी 90 च्या पार भागीदारी केली.
सचिन धसने आपलं अर्धशतक झळकावत टीम इंडियाचा डाव सावरला. सचिन धसने 50 चेंडूत 52 धावांची खेळी करत टीम इंडियाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. सचिन धसने या खेळीत 6 चौकार आणि एक षटकार मारला. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सचिन धसने नाबाद 26, आयर्लंड विरुद्ध नाबाद 21, युएसए विरुद्ध 20 आणि तर न्यूझीलंड विरुद्ध 15 धावांची खेळी केली होती. पण महत्त्वाच्या सामन्यात अर्धशतक झळकावत टीमसाठी देवासारखा धावून आला.
टीम इंडिया आता मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहेत. 250 च्या पार धावसंख्या झाली तर नेपाळला ही धावसंख्या गाठणं कठीण होईल. भारतीय गोलंदाजही चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामुळे नेपाळसमोर मोठं आव्हा असेल. दुसरीकडे, भारताने हा सामना जिंकल्यास थेट उपांत्य फेरीत स्थान मिळवणार आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण अफ्रिकेशी सामना होण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, सौम्य पांडे, आराध्य शुक्ला
नेपाळ अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): अर्जुन कुमाल, दीपक बोहरा, उत्तम थापा मगर (विकेटकीपर), देव खनाल (कर्णधार), बिशाल बिक्रम केसी, दीपक डुमरे, गुलसन झा, दीपेश कंडेल, सुभाष भंडारी, आकाश चंद, दुर्गेश गुप्ता