U19 World Cup : अंतिम फेरीत भारत पाकिस्तान येणार आमनेसामने! जाणून घ्या सुपर सिक्सचं गणित
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु आहे. सुपर सिक्समधील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 214 धावांनी धुव्वा उडवला. त्यामुळे नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. नेपाळ विरुद्धचा सामना जिंकला किंवा कमी फरकाने हरलो तरी टीम इंडियाचं उपांत्य फेरीतीली स्थान जवळपास निश्चित असेल. पण बांगलादेशवर सर्वकाही अवलंबून असेल.
मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी चांगली राहिली आहे. पण बाद फेरीत टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे. सुपर सिक्स फेरीत प्रत्येक संघ दोन सामने खेळणार आहे. दोन गटात विभागणी असून प्रत्येक गटात सहा संघ आहेत. त्या गटातील टॉपला असलेल्या दोन संघांना उपांच्या फेरीत स्थान मिळणार आहे. भारताने ग्रुप 1 मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. न्यूझीलंडचा 214 धावांनी धुव्वा उडवल्याने उपांत्य फेरीच्या वेशीवर आहे. आता नेपाळला पुढच्या सामन्यात पराभूत केलं की थेट उपांत्य फेरी गाठणार आहे. नेपाळला पराभूत केलं तर ग्रुप 1 मध्ये अव्वल स्थान गाठेल आणि ग्रुप 2 मधील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी सामना होईल. पण नेपाळने पराभूत केलं तर मात्र जर तरच गणित असेल. बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करणं गरजेचं राहील. नेट रनरेटच्या आधारावर टीम इंडिया उपांत्य फेरी गाठेल. दुसरीकडे, पाकिस्तानही उपांत्य फेरीच्या वेशीवर आहे. बांगलादेशला पराभूत करताच उपांत्य फेरी गाठणार आहे. ग्रुप 2 मधील अव्वल स्थानी असलेल्या संघाशी पाकिस्तानचा सामना होईल. भारत आणि पाकिस्तान यांनी उपांत्य फेरीचा सामना जिंकला तर अंतिम फेरीत हायव्होल्टेज सामना पाहायला मिळेल.
दुसरीकडे, ग्रुप 2 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका चांगली कामगिरी करत आहेत. सुपर सिक्समध्ये वेस्ट इंडिजवर मात मिळवताच ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरी गाठेल. उपांत्य फेरीत पाकिस्तानशी सामना होण्याची शक्यता आहे. तर दक्षिण अफ्रिकेने श्रीलंकेला पराभूत केलं तर उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा होईल. उपांत्य फेरीत भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका हा सामना होईल.
उपांत्य फेरीचा पहिला सामना 6 फेब्रुवारीला होणार आहे. तर दुसरा सामना 8 फेब्रुवारीला होईल. तर अंतिम फेरीचा सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने येणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सुपर सिक्समध्ये भारत विरुद्ध नेपाळ सामना 2 फेब्रुवारीला होणार आहे. भारतीय वेळेनसुार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल.
दोन्ही संघाचे खेळाडू
भारतीय संघ : आदर्श सिंग, प्रियांशु मोलिया, रुद्र मयुर पटेल, सचिन दास, उदय सहारन (कर्णधार), आर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, अरवेली अवनिश राव (विकेटकीपर), इनेश महाजन (विकेटकीपर), आराध्य शुक्ला, धनुष गौडा, मुरुगन पेरुमल अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य कुमार पांडे, प्रेम देवकर
नेपाळ संघ : आकाश त्रिपाठी, अर्जुन कुमाल, बिशल बिक्रम केसी, दीपक बोहरा, देव खनाल (कर्णधार), दिपेश प्रसाद कंडेल, बिपीन रावल (विकेटकीपर), दीपक दुम्रे (विकेटकीपर), दीपक बोहरा, उत्तम मगर, आकाश चंद, दुर्गेश गुप्ता, गुलसन झा, सुबाश भंडारी, तिलक राज भंडारी