U19 World Cup IND vs SA : उपांत्य फेरीत उदय सहारनची कॅप्टन इनिंग, बीडच्या सचिन धसची मिळाली साथ
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर उदय सहारन आणि सचिन धस यांनी डाव सावरला. मोक्याच्या क्षणी या दोघांनी 150 हून अधिक धावांची भागीदारी केली. डाव झटपट आटपेल असं वाटत असताना दोघांनी दक्षिण अफ्रिकन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.
मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना रंगला. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण दक्षिण अफ्रिकेने त्यांच्याच भूमीत 50 षटकात 7 गडी गमवून 244 धावा केल्या. तसेच विजयासाठी 245 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेत पेलणं तसं सोपं नव्हतं. पण एक वेळ अशी होती की भारताचा डाव 100 रन्सवरच आटोपतो की अशी शंका होती. पण कर्णधार उदय सहारन आणि बीडच्या सचिन धसने डाव सावरला. पाचव्या गड्यासाठी 150 हून अधिक धावांची भागीदारी केली. निकाल काहीही लागो पण या दोघांनी खऱ्या अर्थाने झुंज दिली हे अधोरेखित करावंच लागेल. कारण भारताच्या अवघ्या 32 धावांवर चार विकेट्स गेल्या होत्या. मुशीर खानकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती पण त्यालाही काही खास करता आलं नाही. आदर्श सिंग तर खातंही खोलू शकला नाही. आर्शिन कुलकर्णी 12 धावा करून तंबूत परतला. तर प्रियांशु मोलियाने फक्त 5 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियावर दडपण वाढलं होतं. पण सचिन धस आणि उदय सहारनने विजयाचा मार्ग निश्चित केला होता.
बीडच्या सचिन धसने कर्णधार उदय सहारन याला उत्तम साथ दिली. मानहानी पराभवापासून रोखलं तसेच मोठी धावसंख्या उभारून देण्यास मदत केली. जिथे आवश्यक तिथे फटकेबाजी, तर पुढच्या विकेट्सचा विचार करून सावध खेळीही केली. त्यामुळे टीम इंडियाला मोठा फायदा झाला. आघाडीच्या फलंदाजांनी साथ दिली असती तर विजय आणखी सोपा झाला असता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. उदय सहारन आणि सचिन धसच्या खेळीने विजय मिळवणं शक्य झालं. दोघांचं शतक तर झालं नाही. पण उपांत्य फेरीत विजय मिळवण्यात सिंहाचा वाटा राहीला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका U19 (प्लेइंग इलेव्हन): ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), स्टीव्ह स्टोल्क, डेव्हिड टीगर, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान मारेस, जुआन जेम्स (कर्णधार), ऑलिव्हर व्हाइटहेड, रिले नॉर्टन, ट्रिस्टन लुस, न्कोबानी मोकोएना, क्वेना माफाका
भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी, सौम्य पांडे