U19 World Cup : भारताचं आयर्लंडसमोर विजयासाठी 302 धावांचं आव्हान
अंडर 19 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची जबरदस्त कामगिरी सुरु आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केल्यानंतर आयर्लंडसमोर मोठं आव्हान ठेवलं आहे. मुशीर खान आणि उदय सहारन यांनी जबरदस्त खेळी करत भारताला धावांचा डोंगर रचून दिला.
मुंबई : अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने आयर्लंडसमोर विजयसाठी 302 धावांचं आव्हान ठेवलं. भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 301 धावा केल्या आणि 302 धावांचं लक्ष्य दिलं. आता हे आव्हान आयर्लंड संघ कसं पार करते हे पाहणं औत्सुक्याचं आहे. भारताकडून मुशीर खान आणि कर्णधार उदय सहारन यांनी जबरदस्त खेळी केली. त्यांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं. भारताकडून आदर्श सिंग आणि आर्शिन कुलकर्णी ही जोडी मैदानात उतरली होती. पण संघाच्या 32 धावा असताना 17 या वैयक्तिक धावसंख्येवर आदर्श बाद झाला. त्यानंतर मुशीर आणि आर्शिनने 48 धावांची भागीदारी केली. पण आर्शिन वैयक्तिक 32 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मुशीर खान आणि उदय सहारन यांनी मोर्चा सांभाळला. मुशीर खान याने 106 चेंडूत 118 धावा केल्या. यात 9 चौकार आमि 4 षटकारांचा समावेश आहे. तर उदय सहारन याने 84 चेंडूत 75 धावा केल्या. यात त्याने 5 चौकार मारले.
त्यानंतर अरवेली अवनीश याने 22, सचिन दास याने 21, प्रियांशु मोलियाने 2 तर मुरुगन अभिषेकला 0 धावसंख्येवर तंबूत परतावं लागलं. आयर्लंडकडून ओलिवर रिलेने 3, जॉन मॅकनलीने 2 आणि फिन लुटनने 1 गडी बाद केला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या साम्यात मुशीर खानला हवी तशी फलंदाजी करता आली नव्हती. पण दुसऱ्या सामन्यात मुशीर खानने जबरदस्त कमबॅक करत शतक ठोकलं. आता आयर्लंडला कमी धावसंख्येवर रोखून टीम इंडियला रनरेटमध्ये बढत घेण्याची संधी आहे. त्यामुळे सुपर सिक्समधील टीम इंडियाचा मार्ग सोपा होईल.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
आयर्लंड प्लेईंग ईलेव्हन | फिलिपस ले रॉक्स (कॅप्टन), जॉर्डन नील, रायन हंटर (विकेटकीपर), कियान हिल्टन, स्कॉट मॅकबेथ, जॉन मॅकनॅली, कार्सन मॅककुलो, ऑलिव्हर रिले, मॅकडारा कॉस्ग्रेव्ह, डॅनियल फोर्किन आणि फिन लुटन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंह, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (विकेटकीपर), सचिन धस, मुरुगन अभिषेक, धनुष गौडा, सौम्य पांडे आणि नमन तिवारी.