IND vs AFG | 14 महिन्यांनी परतताच पहिल्याच सामन्यात ‘विराट’ रेकॉर्ड, कोहलीने रचला इतिहास
Virat Kohli | विराट कोहलीला वैयक्तिक कारणामुळे अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात खेळता आलं नाही. मात्र विराटने दुसऱ्या सामन्यातून कमबॅक केलं आणि रेकॉर्डही केलं. नक्की काय केलंय जाणून घ्या.

इंदूर | टीम इंडियाने अफगाणिस्तानवर दुसऱ्या टी 20 सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेलं 173 धावांचं आव्हान हे टीम इंडियाने 15.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने या विजयासह मालिकाही जिंकली. टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल ही मुंबईकर जोडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. यशस्वीने सर्वाधिक 68 धावा केल्या. तर शिवमने नाबाद 63 धावांचं योगदान दिलं.
यशस्वी-शिवम व्यतिरिक्त 14 महिन्यांनी टीममध्ये पुन्हा परतलेल्या विराट कोहली याने 29 धावांचं योगदान दिलं. विराटने या 29 धावांसह मोठा रेकॉर्ड केला आहे. विराटने 181.25 च्या स्ट्राईक रेटने 5 चौकारांच्या मदतीने 29 धावा केल्या. विराटने या 29 धावांच्या मदतीने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
विराट कोहली याने टी 20 क्रिकेटमध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना 2 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. विराट अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला आहे. विराटच्या नावावर आतापर्यंत विजयी धावांचा पाठलाग करताना 2 हजार 12 धावा आहेत. तसेच विराट टी 20, वनडे आणि टेस्टमध्ये चेज करताना प्रत्येकी 2 हजार धावा करणारा क्रिकेट विश्वातील पहिला फलंदाज ठरला आहे.
सर्वाधिक धावांचा विक्रम कुणाच्या नावावर?
दरम्यान टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेजिंग करताना सर्वाधिक धावांचा विक्रम हा आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग याच्या नावावर आहे. पॉलने आतापर्यंत 2 हजार 74 धावा केल्या आहेत.
टी 20 मध्ये चेजिंग करताना सर्वाधिक धावा
रोहित शर्मा, टीम इंडिया, 1 हजार 465 धावा. बाबर आझम, पाकिस्तान, 1 हजार 628 धावा. डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलिया, 1 हजार 788 धावा. विराट कोहली, टीम इंडिया, 2 हजार धावा. पॉल स्टर्लिंग, आयर्लंड, 2 हजार 74 धावा.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान(कर्णधार), रहमानुउल्लाह गुरबाज(विकेटकीपर), अजमातुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.