Virat Kohli Form : ‘अच्छे दिन’ येतील! विराट कोहलीच्या फॉर्मवर रिकी पाँटिंगचं भाष्य, दिला अनमोल सल्ला
विराटने सामन्यासाठी स्वत: ला तयार करण्याचा मार्ग शोधायला हवा.
नवी दिल्ली : विराटला नेमकं काय झालंय, हे त्याच्या चाहत्यांनाही प्रश्न पडला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बऱ्याच दिवसांपासून त्याच्या फॉर्मशी (Form) झगडत आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) मध्येही त्याची कामगिरी खूपच सुमार राहिल्याच दिसून आलं. विराट कोहलीनं शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये केलं होतं. त्यानंतरही तो सातत्यानं चांगल्या खेळी खेळत होता. मात्र, त्याचे शतक पूर्ण होत नव्हते. यंदा विराट पूर्णपणे शांत दिसून आला. आयपीएल 2022 मध्येही त्याची सुमार कामगिरी दिसून आली. तो आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये तीन वेळा पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याच दिसून आलं. यामुळे त्याच्या सुमार कामगिरीविषयी चहुकडे चर्चा होऊ लगली. यावेळी त्याला अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी सल्ले देखील दिले. तर अनेकांनी त्याला काही दिवसांची सुट्टी घेण्याचा आणि स्वत:साठी वेळ देण्याचा सल्लाही दिला. मात्र, आता यावर रिकी पाँटिंगनं (Ricky Ponting) भाष्य केलंय. रिकी काय म्हणाला याची उत्सुकता तुम्हाला लागून असेलच. तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रिकी पाँटिंगची प्रतिक्रिया
क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग विराट कोहलीच्या फॉर्मवर बोलला आहे. तो म्हणतो की कोहली थकला आहे. आयसीसीच्या रिव्ह्यूमध्ये पाँटिंग म्हणाला, ‘अशी परिस्थिती प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत एकदा येते. विराट गेल्या 10-12 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. इतका वाईट टप्पा त्याने कधीच पाहिला नव्हता. त्याला आयपीएलमध्ये पाहून कोहली थकल्याच्या चर्चा होतायेत. मला वाटतं की कोहलीनं याचा विचार करावा आणि सुधारण्यासाठी काहीतरी मार्ग काढायला हवा. मग ते तांत्रिक असो वा मानसिक, यावेळी पाँटिंगनं एकूणच त्याला स्वत:कडे पूर्ण लक्ष देण्याचाही सल्ला दिलाय.
अच्छे दिन येतील!
विराट कोहलीबद्दल रिकी पुढे बोलताना म्हणाला की, ‘माझ्या अनुभवातून मला एक गोष्ट कळते की खेळाडू थकत नाहीत, असा विचार करून स्वतःची फसवणूक करत असतात. अशा वेळी नेहमीच सराव करण्याचा आणि सामन्यासाठी स्वत: ला तयार करण्याचा मार्ग शोधायला हवा. रिकी पुढे म्हणतो की, मला वाटतं कोहलीच्या बाबतीतही असंच काहीसं घडतंय. मात्र, कोहलीचा खराब फॉर्म फार काळ टिकणार नाही, असा विश्वास पाँटिंगला आहे. असं म्हणून त्याने एक प्रकारे कोहलीच्या आयुष्यात लवकरच अच्छे दिन येतील, असंच म्हटलंय.
इंग्लंडविरुद्ध पुनरागमन करणार
विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती घेतली आहे. पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी तो मैदानात उतरणार आहे. गेल्या वर्षी विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 4 सामन्यांनंतर 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर होता. कोरोनामुळे अंतिम सामना होऊ शकला नाही. यंदाही तोच सामना होणार आहे.