WCL 2024 : सलग तीन सामन्यात पराभूत होऊनही टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक, झालं असं की…
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेत टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिल्यानंतरही टीम इंडियाने उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे. दक्षिण अफ्रिकेला टीम इंडियाविरुद्ध विजय मिळवूनही तसा काही फायदा झाला नाही.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धा इंग्लंडमध्ये सुरु आहे. या स्पर्धेत दिग्गज माजी खेळाडू सहभागी होतात.टीम इंडिया युवराज सिंगच्या नेतृत्वात या स्पर्धेत उतरली आहे. साखळी फेरीत टीम इंडियाची कामगिरी हवी तशी झाली नाही. सुरुवातीच्या दोन सामन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिजला पराभूत केलं. मात्र त्यानंतर सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेने पराभूत केलं. त्यामुळे उपांत्य फेरीच्या चौथ्या जागेसाठी भारत आणि दक्षिण अफ्रिकेत चढाओढ होती. पाच सामन्यानंतर दोन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण होते. मात्र नेटरनरेटमध्ये भारतीय संघ उजवा ठरला आणि उपांत्य फेरी गाठली. भारताचे 4 गुणांसह -1.267 नेट रनरेट आहे. तर दक्षिण अफ्रिकेचे 4 गुणांसह -1.340 नेट रनरेट आहे. त्यामुळे भारताला पुढच्या प्रवासाचं तिकीट मिळालं. तर दक्षिण अफ्रिकेचं नशिब इथेही फुटकं निघालं असंच म्हणावं लागेल.
दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 210 धावा केल्या आणि विजयासाठी 211 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना भारताचा डाव गडबडला. भारताने 20 षटकात 6 गडी गमवून 156 धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेने भारताला 54 धावांनी पराभूत केले. मात्र नेट रनरेट सुधारता आला नाही. त्यामुळे साखळी फेरीतच दक्षिण अफ्रिकेचा प्रवास संपुष्टात आला. या सामन्यात युसूफ पठाणने 44 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 54 धावा केल्या.
उपांत्य फेरीतील पहिला सामना पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. 12 जुलैला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता हा सामना होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 12 जुलैला भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजता हा सामना असेल.दोन्ही सामने इंग्लंडच्या नॉर्थप्टनमधील काउंटी क्रिकेट ग्राउंडवर होतील. भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीचे सामने जिंकण्यास यशस्वी ठरले. तर अंतिम फेरीत भारत पाकिस्तान सामन्याची मेजवानी क्रीडारसिकांना मिळेल.
भारत चॅम्पियन्स संघ : युवराज सिंग (कर्णधार), रॉबिन उथप्पा, नमन ओझा (विकेटकीपर), सुरेश रैना, गुरकीरत सिंग मान, इरफान पठाण, युसूफ पठाण, विनय कुमार, हरभजन सिंग, धवल कुलकर्णी, आरपी सिंग, राहुल शुक्ला, सौरभ तिवारी, अनुरीत सिंग, अंबाती रायुडू, पवन नेगी, राहुल शर्मा.