‘मी पडलो, तर काय?, पण…’ टोकाची टीका झेलणाऱ्या Virat Kohli ची सोशल मीडियावर खास पोस्ट
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर (IND vs ENG) आहे. या दौऱ्यातील भारतीय संघाच्या कामगिरीपेक्षा विराट कोहली बद्दलच बरीच चर्चा होतेय. विराट कोहलीवरुन (Virat Kohli) भारताच्या माजी क्रिकेटपटुंमध्येच दोन गट पडले आहेत.
मुंबई: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर (IND vs ENG) आहे. या दौऱ्यातील भारतीय संघाच्या कामगिरीपेक्षा विराट कोहली बद्दलच बरीच चर्चा होतेय. विराट कोहलीवरुन (Virat Kohli) भारताच्या माजी क्रिकेटपटुंमध्येच दोन गट पडले आहेत. एक गट विराटला टी 20 संघाबाहेर करण्याची मागणी करतोय. दुसरा गट विराटची पाठराखण करतोय. इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर वेस्ट इंडिजची सीरीज (West indies) आहे. त्यानंतर आशिया कप आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप होणार आहे. या सगळ्या सीरीजच्या पार्श्वभूमीवर विराट कोहली भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे, असं भारतीय टीम मॅनेजमेंटने स्पष्ट केलय. कॅप्टन रोहित शर्मा विराट कोहलीची जाहीर पत्रकार परिषदांमध्ये पाठराखण करतोय. एकूणच सर्व चर्चा विराट भोवती फिरत आहेत. मागच्या अडीच वर्षात त्याला शतक झळकावता आलेलं नाही. सध्या सुरु असलेल्या इंग्लंड दौऱ्यातही तो फ्लॉप आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याने 11,20, 1, 11 आणि 16 धावा केल्या आहेत. विराट कोहलीला क्रिकेटपासून ब्रेक घेण्याचा सल्ला दिलाय.
विराटने पोस्ट मधून केलेल्या भाष्याचा अर्थ काय?
या चर्चा, शक्यतांच्या पार्श्वभूमीवर अखेर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केलीय. त्याने त्यातून त्याला काय वाटतं? या बद्दल थेट भाष्य केलेलं नाही. पण सध्याच्या परिस्थितीवर त्याने फोटोच्या माध्यमातून एक लोकप्रिय कोट टाकला आहे. विराटने काळ्या रंगाच्या भिंतीजवळ बसून काढलेला फोटो पोस्ट केलाय. या भिंतीवर एक संदेश लिहिलेला आहे. ‘मी पडलो, तर काय? ओह बट माय डार्लिंग, तू उडालास तर काय?’ असा संदेश त्यावर लिहिलेला आहे. विराटने कॅप्शन मध्ये ‘दृष्टीकोन’ एवढच म्हटलेलं आहे. बाहेर सुरु असलेल्या चर्चांवर विराटने उपरोधिकपण भाष्य केलय. पण या सगळ्यामध्ये तो सकारात्मक असल्याचं सुद्धा या पोस्ट मधून दिसतय.
View this post on Instagram
भारतीय चाहत्यांची काय इच्छा?
विराटची आता फक्त बॅट तळपावी, एवढीच चाहत्यांची इच्छा आहे. मागच्या अडीच वर्षात विराटच्या बॅट मधून शतक निघालं नाही. ती इच्छा उद्या मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफड मैदानावर पूर्ण व्हावी एवढीच भारतीय क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा आहे.