U-19 WC Final : कंजूस गोलंदाजीने भारताला बनवलं वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे तितास साधु?
U-19 WC Final : तितास साधुच्या बॉलिंगमुळे फायनलमध्ये इंग्लंडची टीम बॅकफूटवर गेली. पहिल्याच ओव्हरमध्ये तिने टीम इंडियाला सुरुवातच तशी करुन दिली. 1.50 तिच्या गोलंदाजीची इकॉनमी होती.
U-19 WC Final : टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवलय. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली ही टीम दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली, त्यावेळी ही टीम वर्ल्ड कप फायनल जिंकेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण या टीमने कमाल केली. रविवारी फायनलमध्ये याच टीम इंडियाने बलाढ्य इंग्लंडला सात विकेटने हरवून वर्ल्ड कप जिंकला. मिताली राज आणि हरमनप्रीत कौरला जे जमलं नाही, ते काम शेफालीने करुन दाखवलं. फायनलमध्ये टीम इंडियासमोर इंग्लिश टीमच काहीच चाललं नाही. वेगवान गोलंदाज तितास साधुच यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान होतं.
पहिल्यांदा जिंकला वर्ल्ड कप
महिला क्रिकेटमध्ये भारताने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकलाय. याआधी मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम 2005 आणि 2017 साली वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. 2020 साली हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय सीनियर महिला टीमने टी 20 वर्ल्ड कपचा फायनल सामना खेळला होता. तिन्हीवेळा वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. पण शेफालीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा अंडर 19 वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवलय.
तिताससमोर इंग्लंडची शरणागती
शेफालीने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला गोलंदाजांनी या मॅचमध्ये कमाल केली. तितासने पहिल्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर लिबर्टी हीपला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. इंग्लंडसाठी हा मोठा झटका होता. त्यानंतर सेरेन स्मालेची विकेट काढली. तितासने फक्त विकेटच काढल्या नाहीत, तर इंग्लिशन फलंदाजांना जखडून ठेवलं. त्यांना धावा करु दिल्या नाहीत. चार ओव्हरमध्ये तितासने फक्त 6 धावा देऊन 2 विकेट काढल्या. 1.50 तिच्या गोलंदाजीची इकॉनमी होती.
याच कामगिरीमुळे तितासला फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. तितासने या वर्ल्ड कपमध्ये सहा सामने खेळून सहा विकेट घेतल्या. कोण आहे तितास साधु?
तितास साधु पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात चुचुडा येथे राहते. तिने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले. तितास फायनलमध्ये चांगलं प्रदर्शन करेल, अशी अपेक्षा होती, असं कोच रणदीप साधु यांनी सांगितलं. बंगालमधूनच येणारी महान गोलंदाज झुलन गोस्वामी तिचं प्रेरणास्थान आहे. तितासने चुंचुडाच्या मैदानात सराव करुन क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. वडिलांशिवाय तितासने प्रियंकर मुखोपाध्याय आणि देवदूलाल रॉय चौधरी यांच्याकडेही क्रिकेटचे बारकावे शिकलेत. भारतीय महिला क्रिकेट टीममध्ये तितास एकमेव बंगालची क्रिकेटपटू होती. फायनल मॅचआधी तितासचे वडील म्हणाले होते की, ‘बंगालच्या मुली बाकी मुलींपेक्षा पुढे आहेत’