“आरसीबीला आयपीएल ट्रॉफी कोण जिंकवून देणार”, अंबाती रायुडूचा विराट कोहलीवर अप्रत्यक्षरित्या निशाणा
आयपीएल 2024 स्पर्धेत आता जेतेपदाचं स्वप्न तीन संघच उराशी बाळगून आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे तीन संघ शर्यतीत आहेत. आरसीबी, चेन्नई सुपर किंग्स यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र साखळी फेरीतील सामन्यानंतर या दोन्ही संघाचे चाहते आमनेसामने आले आहेत. ही आग अजूनही धगधगती आहे. चेन्नईच्या पराभवानंतर अंबाती रायुडू रडला होता. त्यानंतर त्याने टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.
आयपीएल 2024 स्पर्धेतून सात संघांना आव्हान संपुष्टात आलं आहे. यात चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ देखील आहेत. प्लेऑफसाठीच्या अतितटीच्या लढतीत आरसीबीने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं होतं आणि एलिमिनेटर फेरीत स्थान मिळवलं होतं. पण एलिमिनेटर फेरीत आरसीबीला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. राजस्थान रॉयल्सने आरसीबीला पराभवाची धूळ चारली. चेन्नई सुपर किंग्सचा साखळी फेरीतील पराभव अजूनही काही जणांच्या पचनी पडलेला नाही. इतकंच काय तर माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू यालाही अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर रायुडूने आरसीबी आणि विराट कोहलीवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आता आरसीबीच्या पराभवानंतर हाती आयतं कोलित मिळालं आहे. आरसीबीला डिवचण्याची एक संधी आयती हातात मिळाली आहे. यावेळी विराट कोहलीचं नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला आहे. पुढच्या पर्वात आरसीबीला जेतेपद जिंकण्यासाठीचा फॉर्म्युला सांगितला आहे. तसेच पराभवासाठी विराट कोहलीही जबाबदार असल्याचं कारण सांगितलं आहे
अंबाती रायुडूने आरसीबीच्या चाहत्यांप्रती आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बंगळुरुच्या समर्थकांचं वाईट वाटत असल्याचं देखील सांगितलं आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून आरसीबीचं समर्थन करत आले आहेत. मात्र जेतेपद काही मिळालं नाही. चेन्नई सुपर किंग्सच्या विजयात मोलाची साथ असलेल्या रायुडूने आरसीबीच्या पराभवासाठी लीडरशिप कारण असल्याचं सांगितलं आहे. रायुडूने सांगितलं की, “व्यवस्थापन आणि मोठे प्लेयर्स वैयक्तिक रेकॉर्डच्या वर टीमचं हित ठेवलं असतं तर आतापर्यंत जेतेपद मिळालं असतं.” या माध्यमातून अंबाती रायुडूने विराट कोहलीवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.
My heart truly goes out to all the rcb supporters who have passionately supported the team over the years. If only the management and the leaders had the teams interests ahead of individual milestones .. rcb would have won multiple titles. Just remember how many fantastic players…
— ATR (@RayuduAmbati) May 24, 2024
विराट कोहली 10 वर्षे आरसीबीचा कर्णधार होता. या दरम्यान त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. फायनलपर्यंतही संघाला पोहोचवलं. पण जेतेपद काही मिळालं नाही. या संघात दिग्गज खेळाडूंची भरती-ओहोटी सुरुच आहे. अशीच टीका रायुडू व्यतिरिक्त इतर क्रीडा तज्ज्ञांनीही केली आहे. अंबाती रायुडू अशी टीका करून इथेच थांबला नाही, तर विराट कोहलीला अप्रत्यक्षरित्या डिवचलं. फक्त तो खेळाडू फ्रेंचायसीला ट्रॉफी जिंकून देऊ शकतो जो स्वत: पहिल्यांदा टीमचं हित पाहील, असं अंबाती रायुडू म्हणाला. अंबाती रायुडूने आरसीबी एलिमिनेटर फेरीत पराभूत झाल्यानंतरही डिवचलं होतं. अग्रेशन आणि सेलिब्रेशनने ट्रॉफी जिंकली जात नाही असं सांगितलं होतं.