IPL 2025 : “मला कोणी विकत घ्या किंवा नाही, पण..”, लिलावापूर्वी जेम्स अँडरसनने सांगितला प्लान
आयपीएल 2025 मेगा लिलावात इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने नाव नोंदवलं आहे. त्याने 17 वर्षानंतर आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नाव नोंदवल्यानंतर त्याने सांगितलं की,टी20 फॉर्मेटमध्ये 4 षटकं टाकण्यासाठी मी पूर्णपणे फीट आहे. मी पुन्हा क्रिकेट खेळू इच्छितो.
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी देशविदेशात 1574 खेळाडूंनी नाव नोंदवलं आहे. या यादीत इंग्लंडचा माजी दिग्गज खेळाडू जेम्स अँडरसन याचंही नाव आहे. आतापर्यंतच्या 17 पर्वात अँडरसनने कधीच भाग घेतला नव्हता. इतकंच काय तर टी20 क्रिकेटमध्येही गेल्या 10 वर्षात भाग घेतला नाही. त्यामुळे अचानक त्याने आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केल्याने आश्चर्य वाटत आहे. पण त्याने आयपीएल खेळण्यासाठीचं कारणही स्पष्ट केलं आहे. ‘मला वाटते की टी20 फॉर्मेटमध्ये 4 षटकं टाकण्यासाठी मी पूर्णपणे फीट आहे. लिलावात फ्रेंचायझी मला विकत घेण्यासाठी इच्छित असो की नसो, हा वेगळा प्रश्न आहे. पण मी क्रिकेट खेळू इच्छित आहे.’, असं जेम्स अँडरसने सांगितलं. जेम्स अँडरसन आतापर्यंत 19 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यात त्याने 422 चेंडूत टाकले असून 552 धावा दिल्या आहेत. तसेच 18 विकेट घेतल्या आहेत. 23 धावा देत 3 गडी ही सर्वोत्तम खेळी आहे. गोलंदाजीत प्रति षटकं धावा देण्याची सरासरी ही 7.85 इतकी आहे. जेम्स अँडरसनने 2002 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये टी20 पदार्पण केलं होतं. तर शेवटचा टी20 सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2009 मध्ये खेळला होता.
“माझ्यात अजूनही बरंच क्रिकेट शिल्लक आहे. मी आयपीएल 2025 पर्वात भाग होऊ इच्छित आहे. मी पूर्णपणे फिट देखील आहे. सलग गोलंदाजीही करत आहे. मला वाटतं की, जर मला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली, तर चांगलं होईल.”, असं जेम्स अँडरसनने सांगितलं. पण जेम्स अँडरनसोबत कोणत्या फ्रेंचायझीने संपर्क साधला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नावर जेम्स अँडरसनने सांगितलं की, अजून तरी कोणत्याच आयपीएल संघाने संपर्क साधलेला नाही. पण मी फिटनेसवर काम करत आहे आणि संधीची वाट पाहात आहे.
आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये अनुभवी जेम्स अँडरसनवर चेन्नई सुपर किंग्स डाव लावू शकते,अशी चर्चा आहे. इतकंच काय तर आयपीएल इतिहासात सर्वाधिक जेतेपद मिळवलेली चेन्नई सुपर किंग्स अँडरसनच्या खांद्यावर गोलंदाजी प्रशिक्षकाची धुराही सोपवू शकते. आतापर्यंत ड्वेन ब्रावो चेन्नईचा गोलंदाज प्रशिक्षक होता. पण आता कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत असणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला मार्गदर्शकाची भूमिका दिली आहे.