वनडे संघात संजू सॅमसनला जागा का मिळाली नाही? केएल राहुलने सांगितलं कटू सत्य
टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर वनडे सीरिज जिंकली आहे. वनडे मालिका 2-1 ने खिशात घातली. तिसऱ्या निर्णायक सामन्यात संजू सॅमसनने जबरदस्त फलंदाजी करत शतकी खेळी केली. त्याच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. असा असताना सामन्यानंतर केएल राहुल त्याच्याबाबत बरंच काही बोलून गेला.

मुंबई : संजू सॅमसन हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात दुर्दैवी क्रिकेटपटू असल्याचं काही आजी माजी क्रिकेटपटू आणि क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पण संजू सॅमसनने ही मतं एका मुलाखतीत खोडून टाकली होती. मला जे काही मिळालं आहे त्यात मी आनंदी आहे असं त्याने सांगितलं होतं. दुसरीकडे, संघात घेऊनही संजू सॅमसनला हवी तशी संधी मिळत नव्हती. अनेकदा त्याच्यापर्यंत फलंदाजीही येत नव्हती. तर कधी फलंदाजी आली तर धावा होत नव्हत्या. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. संजू सॅमसनला तिसऱ्या वनडे सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोनं केलं. संजू सॅमसनने तिसऱ्या क्रमांकावर खेळत शतक ठोकलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं संजू सॅमसनचं हे पहिलंच शतक आहे. त्याच्या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. संजू सॅमसनची खेळीनंतर कर्णधार केएल राहुल याने आनंद व्यक्त केला आहे. तसेच स्तुती करता करता एक कटू सत्य बोलून गेला.
केएल राहुलने सांगितलं की, “मी संजूसाठी खूप खूश आहे. त्याने इतकी वर्षे आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. पण दुर्दैवाना आम्ही त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदासाठी संधी देत नाहीत. या स्थानासाठी बॅटिंग ऑर्डर पाहता वनडे क्रिकेटमध्ये आमच्याकडे दिग्गज खेळाडू आहे. पण मला आनंद आहे की, त्याने या संधीचं सोनं केलं.” संजू सॅमसनच्या 108 आणि तिलक वर्माच्या 52 धावांच्या जोरावर टीम इंडियाने आठ गडी गमवन 296 धावा कल्या. तर दक्षिण अफ्रिकेचा संघ 45.5 षटकात सर्वबाद 218 धावा करू शकला.
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात कमी धावसंख्येमुळे संजू सॅमसनला फलंदाजी मिळाली नाही. तर दुसऱ्या सामन्यात पाचव्या स्थानावर उतरत 12 धावा करून बाद झाला. तिसऱ्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर उतरला आणि शतकी खेळी केली.संजू सॅमसन म्हणाला की, “शतकामुळे मला आनंद झाला आहे. कारण आम्ही हा सामना जिंकलो. मी खूप मेहनत घेतली. या फॉर्मेटमध्ये विकेट आणि गोलंदाजी समजून घेण्यास अतिरिक्त वेळ मिळतो. टॉप ऑर्डवर खेळत असल्याने 10-20 चेंडू जास्त मिळतात”
टी20 आणि वनडे मालिकेनंतर टीम इंडियाचं पुढचं लक्ष्य आता कसोटी मालिका असणार आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची आहे. एक पराभव किंवा सामना ड्रॉ होणं भारताला परवडणारं नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं अव्वल स्थान गमवावं लागेल.
