इशान किशन आणि श्रेयस प्रकरणावर राहुल द्रविडने अखेर मौन सोडलं, स्पष्टच सांगितलं की…
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील टी20 मालिका 11 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया सज्ज आहे. पण या मालिकेपूर्वी काही वादाला तोंडही फुटलं आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचा मुद्दा गाजत आहे. याबाबत आता प्रशिक्षक राहुल द्रविडने मौन सोडलं असून काय झालं ते सांगितलं आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या निवडीवरून वादाची ठिणगी पडली आहे. विकेटकीपर इशान किशनची निवड न केल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातून इशान किशनने अचानक माघार घेतली होती. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत निवड करण्यात न आल्याने वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पहिला टी20 सामना 11 जानेवारीला मोहालीत होणार आहे. या सामन्यापूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविड पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरा गेला. त्यावेळी त्याने मनमोकळेपणाने इशान किशन आणि श्रेयस अय्यर मुद्द्यावर मत मांडलं. राहुल द्रविडने पत्रकार परिषदेत सांगितलं की, इशान किशनबाबत मीडिया रिपोर्ट्स चुकीचे आहेत. निवडीसाठी तो उपलब्ध नव्हता आणि कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची कारवाई केलेली नाही. त्यामुळे सर्व चर्चा मूर्खपणाच्या आहे. तर श्रेयस अय्यरला न निवडण्याचं कारण म्हणजे संघात बऱ्यापैकी फलंदाज आहेत.
इशान किशनवर शिस्तभंगाची कारवाई केल्याप्रकरणी कारवाई केली आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना प्रशिक्षक राहुल द्रविड याने सांगितलं की, “नाही, असं अजिबात नाही. इशान किशन निवडीसाठी उपलब्ध नव्हता. इशानने ब्रेक घेतला आहे. त्यावर दक्षिण अफ्रिकेतच ठरलं होतं. आम्ही त्याला पाठिंबा दिला . त्याने अजूनपर्यंत उपलब्ध असल्याचं सांगितलं नाही. जेव्हा असेल तेव्हा तो देशांतर्गत क्रिकेट खेळेल आणि निवडीसाठी उपलब्ध असेल.”
“श्रेयस अय्यरला डावलण्यामागेही दुसरं तिसरं असं काही कारण नाही. कारण फक्त इतकंच आहे की संघात बऱ्यापैकी फलंदाज आहेत. त्यामुळे श्रेयसला संधी मिळाली नाही. त्याने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळला नाही. खूप सारे फलंदाज आहेत. प्रत्येकाला फिट करणं सोपं नाही. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई वगैरे काही नाही. मी तर निवडकर्त्यांसोबत असं काही चर्चा केली नाही.”, असंही राहुल द्रविड श्रेयस अय्यरबाबत विचारलेल्या प्रश्नावर विचारलं.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान, मुकेश कुमार