WI vs IND 2nd T20 | त्यांच्याकडून रन्सची अपेक्षा नाही, दुसऱ्या पराभवानंतर Hardik Pandya स्पष्ट बोलला
WI vs IND 2nd T20 | हार्दिक पांड्याला आपल्या टीममधल्या कुठल्या प्लेयर्सकडून रन्सची अपेक्षा नाही?. पराभवानंतर हार्दिक पांड्या काय म्हणाला?. आणखी एक पराभव झाल्यास टीम इंडियाला मालिका गमवावी लागेल.
गुयाना : दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजवर पलटवार करेल अशी अपेक्षा होती. 5 सामन्यांच्या T20 सीरीजमध्ये टीम इंडिया बरोबरी साधेल, अशी अपेक्षा होती. पण कॅरेबियाई खेळाडूंनी टीम इंडियाला बरोबरी साधण्यापासून रोखलं. दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला 2 विकेटने हरवलं. या विजयानंतर वेस्ट इंडिजने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आणखी एक पराभव झाल्यास टीम इंडियाला मालिका गमवावी लागेल.
दुसऱ्या T20 सामन्यानंतर हार्दिक पांड्या जे काही बोलला, त्यातून बरच काही स्पष्ट होतं. हार्दिक पांड्याला कुठल्या फलंदाजांवर विश्वास आहे? टीमच्या कुठल्या ऑर्डरकडून त्याला धावांच्या अपेक्षा आहेत, ते स्पष्ट होतं.
हार्दिकने मनातलं बोलून दाखवलं
वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाला 150 धावा चेस करता आल्या नव्हत्या. दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाला 153 धावांचा बचाव करता आला नाही. युवा टीमकडून चूका होतात, असं सांगून हार्दिक पांड्याने पहिला पराभव पचवला. पण दुसऱ्या T20 सामन्यात त्याने मनातली गोष्ट बोलून दाखवली. त्याने टीमच्या पराभवाचा खापर फलंदाजांवर फोडलं.
‘ही खरी बाब’
हार्दिक पांड्या दुसऱ्या T20 मधील पराभवानंतर जे बोलला, ते जाणून घ्या. “आम्ही चांगली फलंदाजी केली नाही, ही खरी बाब आहे. आम्ही यापेक्षा चांगले खेळू शकलो असतो. खेळपट्टी थोडी धीमी होती. पण त्यावर 160-170 धावा होऊ शकत नाहीत, इतकी धीमी नक्कीच नव्हती” असं हार्दिक पांड्या म्हणाला.
कोणावर अवलंबून राहू शकत नाही?
फलंदाजांना आपला रोल समजून घ्यावा लागेल, असं हार्दिक पांड्या स्पष्ट बोलला. त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. त्याला टीमच्या लोअर ऑर्डरकडून धावांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हार्दिक म्हणाला की, “सध्या जी टीम आहे, त्यात टॉपचे 7 फलंदाज सोडले, तर इतरांवर धावांसाठी अवलंबून राहू शकत नाहीत” दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 152 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 19 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 155 धावा करत लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.