WI vs IND 4th T20I | टीम इंडिया चौथा सामना जिंकणार की विंडिज उलटफेर करणार?
WEST INDIES vs INDIA 4TH T20I | टेस्ट आणि वनडे सीरिजमध्ये पराभूत झाल्यानंतर वेस्ट इंडिजने टी 20 मालिकेत जोरदार कमबॅक करत टीम इंडियाला चोख प्रत्युत्तर दिलंय.
फ्लोरिडा | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथा सामना हा शनिवारी 12 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. हा सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे. वेस्ट इंडिजने या मालिकेत सलग 2 सामने जिंकत एकतर्फी आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियाला आता मालिका जिंकण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकणं बंधनकारक आहे. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी सर्व खेळाडूंना योगदान द्यावं लागणार आहे.
वेस्ट इंडिज पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियावर वरचढ ठरली. विंडिजने बॅटिंग-बॉलिंगसह जबरदस्त फिल्डिंग केली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांना 150 धावांचं आव्हानही गाठता आलं नाही. पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा फक्त 4 धावांनी पराभव झाला. विंडिजने 150 धावांचा शानदार बचाव करत टीम इंडियाला 145 धावांवरच रोखलं. विंडिजने अशाप्रकारे पहिला सामना जिंकला.
तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजयासाठी दिलेलं 153 रन्सचं टार्गेट विंडिजने रखडत रखडत 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. विंडिजने या विजयासह मालिकेत 2-0 आघाडी घेतली. विंडिजच्या दुसऱ्या विजयासह टीम इंडियावर मालिका पराभवाची टांगती तलवार आली. मात्र टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात दमदार कमबॅक केलं.
तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने 160 रन्सचं टार्गेट 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने यासह विजयाचं खातं उघडलं. इतकंच नाही, तर मालिकेतील आव्हान कायम राखलं. आता टीम इंडियाला चौथा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी टीम इंडियाला एकट्या दुसऱ्यावर विसंबून न राहता सर्वांनाच योगदान द्यावं लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला विंडिजचा चौथ्या सामन्यासह मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे.
विंडिजला टीम इंडिया विरुद्ध गेल्या 8 वर्षांपासून टी 20 सीरिज जिंकता आलेली नाही. वेस्ट इंडिजने टीम इंडिया विरुद्ध अखेरची टी 20 मालिका 2016 मध्ये जिंकली होती. विंडिजला आता 8 वर्षांनंतर टी 20 सीरिज जिंकण्याची प्रतिक्षा संपवण्याची संधी आहे. आता विंडिज ही प्रतिक्षा संपवते की टीम इंडिया रोखते हे चौथ्या सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल.