WI vs SCO: T20 world cup 2022 मध्ये आणखी एक धक्कादायक निकाल, वेस्ट इंडिजचा पराभव
WI vs SCO: वर्ल्ड कपमध्ये हे काय चाललय? काल श्रीलंका आज वेस्ट इंडिजचा नवख्या टीम्सकडून पराभव
मुंबई: T20 World Cup 2022 मध्ये आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. होबार्टमध्ये (Hobart) आज स्कॉटलंड विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये (West Indies vs Scotland) सामना झाला. या मॅचमध्ये स्कॉटलंडने बलाढ्य वेस्ट इंडिजला हरवलं. स्कॉटलंडने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 160 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजच्या टीमला फक्त 118 धावा करता आल्या. वेस्ट इंडिजची टीम पूर्ण 20 षटकही खेळू शकली नाही. 18.3 ओव्हर्समध्ये वेस्ट इंडिजचा डाव आटोपला.
वेस्ट इंडिजसाठी हा पराभव खूपच निराशाजनक आहे. वेस्ट इंडिजच्या टीमने दोनवेळा टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. पहिल्यांदाच स्कॉटलंडने त्यांचा पराभव केला.
स्कॉटलंडच्या विजयात कोणाचं महत्त्वपूर्ण योगदान?
स्कॉटलंडच्या विजयात ओपनर मंसेने महत्त्वपूर्ण योगदान दिलं. मंसेने 53 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या. फलंदाजीसाठी कठीण विकेटवर त्याने 9 चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावलं. त्याशिवाय मॅकलॉडने 23 आणि मायकल जोंसने 20 धावा केल्या. कॅप्टन बॅरिंग्टनने 16 आणि ख्रिस ग्रीन्सने 11 चेंडूत 16 धावा फटकावल्या.
वेस्ट इंडिजकडे एकापेक्षा एक मोठे हिटर्स, पण….
वेस्ट इंडिजच्या टीममध्ये एकापेक्षा एका मोठे हिटर्स होते. पण स्कॉटलंडच्या गोलंदाजांसमोर त्यांच काहीच चाललं नाही. काइन मायर्सने 20, एविन लुईसने 14 धावा केल्या. ब्रँडन किंगने 17 रन्स केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजची मिडल ऑर्डर कोसळली. कॅप्टन पूरनने फक्त 4 धावा केल्या.
कोणी वेस्ट इंडिजची लाज वाचवली
शेमराह ब्रूक्सने 4 धावा केल्या. रोव्हमॅन पॉवेलने 5 रन्स केल्या. जेसन होल्डरने 38 धावा करुन वेस्ट इंडिजची लाज वाचवली. कारण वेस्ट इंडिजने आपल्या 9 विकेट फक्त 78 धावात गमावल्या होत्या.
स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी दाखवला दम
होबार्टनच्या फिरकी गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर स्कॉटलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज मार्क वाटने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. त्याने 4 ओव्हरमध्ये 12 धावा देऊन 3 विकेट काढल्या. ब्रॅड व्ही आणि मायकल लीस्कने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. स्कॉटलंडच्या उत्तम गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजने गुडघे टेकले. 60 धावा करणाऱ्या मंसेला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.