श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात दोन विकेटकीपर खेळणार? गौतम गंभीरने सरावादरम्यान दिले असे संकेत
भारतीय संघ तीन टी20 सामने आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. 27 जुलैपासून टी20 मालिकेला सुरुवात होईल. पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत उत्सुकता लागून आहे. असं असताना गौतम गंभीरकडून सराव करताना काही संकेत मिळताना दिसत आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाचा कसून सराव सुरु आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया सज्ज झाली आहे. गौतम गंभीरने खेळाडूंना सरावादरम्यान काही धडे दिले. या सराव शिबीराचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडीओतून टीम इंडियाची पहिल्या टी20 प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत संकेत मिळत आहेत. टी20 संघात ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या दोन विकेटकीपर फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. दोघंही टी20 वर्ल्डकप संघात होते. मात्र संजू सॅमसनला एकही सामना खेळण्यास मिळाला नाही. तर ऋषभ पंत सर्व सामन्यात खेळला. झिम्बाब्वे दौऱ्यात ऋषभ पंतच्या गैरहजेरीत संजू सॅमसन खेळला होता. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात पुन्हा एकदा संजू सॅमसनला बाकावर बसावं लागेल अशी चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. पण बीसीसीआयच्या व्हिडीओतून काही क्रीडाप्रेमींनी वेगळाच अंदाज बांधला आहे. प्लेइंग दोन विकेटकीपर दिसतील असं त्यांचं म्हणणं आहे. सराव शिबिरात गौतम गंभीर विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनसोबत चर्चा करताना दिसत आहे. गंभीर त्याला फलंदाजीचे बारकावे सांगत होता आणि संजू त्याची प्रत्येक गोष्ट तितक्याच आत्मयितेने ऐकत होता.
संजू सॅमसन आतापर्यंत 28 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळला आहे. त्याने 28 सामन्यात 133.33 च्या स्ट्राईक रेटने 444 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश असून 77 ही सर्वोत्तम खेळी आहे. संजू सॅमसनसोबत गंभीरने शिवम दुबेसोबतही चर्चा केली. शिवम दुबे टी20 वर्ल्डकपमध्ये सर्व सामने खेळला होता. झिम्बाब्वे दौऱ्यातही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. अष्टपैलू खेळाडू असल्याने हार्दिक पांड्यासोबत शिवम दुबे प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल असं सांगण्यात येत आहे.
𝗛𝗲𝗮𝗱 𝗖𝗼𝗮𝗰𝗵 𝗚𝗮𝘂𝘁𝗮𝗺 𝗚𝗮𝗺𝗯𝗵𝗶𝗿 𝗧𝗮𝗸𝗲𝘀 𝗖𝗵𝗮𝗿𝗴𝗲! 💪#TeamIndia | #SLvIND | @GautamGambhir pic.twitter.com/sbG7VLfXGc
— BCCI (@BCCI) July 23, 2024
अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, रिंकू सिंह,ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे/रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
भारताचा टी20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.