Women’s World Cup 2022: अजिंक्य ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये धडक, अखेरच्या लीग मॅचमध्ये बांगलादेशचा पराभव
आयसीसी महिला विश्वचषक 2022 स्पर्धेमध्ये (ICC Women’s World Cup 2022) ऑस्ट्रेलियाने (Australia) बांगलादेशचा (Bangladesh) पराभव केला आहे. यासह, या संघाने साखळी टप्प्यातील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक 2022 स्पर्धेमध्ये (ICC Women’s World Cup 2022) ऑस्ट्रेलियाने (Australia) बांगलादेशचा (Bangladesh) पराभव केला आहे. यासह, या संघाने साखळी टप्प्यातील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेशचा 5 विकेटने पराभव केला. एका बाजूने ठराविक अंतराने विकेट जात असूनही खेळपट्टीवर चिकटून नाबाद अर्धशतक झळकावणाऱ्या बेथ मुनीने बांगलादेशवरील ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. ऑस्ट्रेलियाने त्यांचे 7 पैकी 7 सामने जिंकले आहेत, तर बांगलादेशच्या संघाला 6 सामन्यांपैकी 5 व्या पराभवाचा सामना करावा लागला.
वेलिंग्टनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील सामना पावसामुळे उशिरा सुरू झाला, त्यामुळे हा सामना 43-43 षटकांचा झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बांगलादेशने 43 षटकांत 6 विकेट गमावून 135 धावा केल्या. बांगलादेशकडून मधल्या फळीतील फलंदाज लता मंडलने सर्वाधिक 33 धावा केल्या. त्याचवेळी सलामीवीर शर्मीन अख्तर हिने 24 धावांचं योगदान दिलं. या दोघींशिवाय बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून गार्डनर आणि जोनासेन यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.
बेथ मुनीची चिवट खेळी
ऑस्ट्रेलियासमोर 136 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी 32.1 षटकात पूर्ण केले. मात्र, या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीतील विकेट ज्याप्रकारे पडू लागल्या, त्यामुळे सामन्यात उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण, बेथ मुनीने चिवट खेळी करत परिस्थिती संयमाने हाताळली आणि ऑस्ट्रेलिया हा नंबर वन संघ का आहे हे सिद्ध केले.
ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने 75 चेंडूत सर्वाधिक नाबाद 66 धावा केल्या. 95 मिनिटांच्या खेळीत तिने 5 चौकार लगावले आणि सदरलँडसोबत शानदार अर्धशतकी भागीदारी केली. सदरलँड 36 चेंडूत 26 धावा करून नाबाद राहिली आणि संघाची दुसरा सर्वात यशस्वी फलंदाजही ठरली.
Australia maintain their unbeaten record at #CWC22 after beating Bangladesh by 5 wickets ? pic.twitter.com/JT95qhWJqO
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 25, 2022
वाढदिवसाच्या दिवशी कर्णधारासाठी गिफ्ट
ऑस्ट्रेलियाचा हा विजय कर्णधार मॅग लेनिंगसाठी खास होता. वास्तविक, ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या 30 व्या वाढदिवसाच्या दिवशी बांगलादेशवर विजय मिळाला आहे. कर्णधाराच्या बर्थडे म्हणजे सेलिब्रेशन तर होणार आहे. पण आता त्या जल्लोषात विजयाचे रंग मिसळले जातील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेशला आपला पुढचा आणि शेवटचा साखळी सामना इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना 27 मार्च रोजी होणार आहे.
इतर बातम्या
LIVE चर्चेत अचानक Harsha Bhogle यांना काय झालं? Video पाहून चाहत्यांना धक्का, नेमकं काय झालं?
PAK VS AUS: Shaheen Afridi ने आधी वॉर्नरला ठसन दिली, आता दांडी उडवली, एकदा बघाच, हा ‘कडक’ VIDEO