ZIM vs AFG : अफगाणिस्तानची टीम इंडियासारखीच पराभवाने सुरुवात, झिंबाब्वेचा शेवटच्या बॉलवर थरारक विजय
Zimbabwe vs Afghanistan 1st T20i Match Result : झिंबाब्वेने पहिल्या टी 20i सामन्यात अफगाणिस्तानवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या पराभवामुळे क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाची आठवण झाली.
टीम इंडिया आणि अफगाणिस्तान, आशिया खंडातील प्रमुख क्रिकेट संघांपैकी 2 संघ. टीम इंडियाने काही महिन्यांपूर्वीच जून 2024 मध्ये अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप जिंकला. तर अफगाणिस्तानने भल्याभल्या संघांना पराभूत करत उपांत्य फेरीत पहिल्यांदा धडक मारली होती. क्रिकेट विश्वात लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या झिबांब्वेने याच विश्व विजेत्या टीम इंडियानंतर आता अफगाणिस्तानला दणका दिला आहे. झिंबाब्वेने टीम इंडियानंतर अफगाणिस्तानला टी 20i सामन्यात पराभूत केलं आहे.
अफगाणिस्तान सध्या झिंबाब्वे दौऱ्यावर आहे. झिंबाब्वेने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात पाहुण्या अफगाणिस्तानवर 4 विकेट्सने थरारक विजय मिळवला आहे. झिंबाब्वेला विजयासाठी 145 धावांचं आव्हान मिळालं होतं. झिंबाब्वेने हे आव्हान शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेत पूर्ण केलं आणि विजय मिळवला. झिंबाब्वेचा हा टी 20 क्रिकेट इतिहासातील पहिलावहिवा विजय ठरला. झिंबाब्वेने सिंकदर रझा याच्या नेतृत्वात यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर राशिद खानच्या नेतृत्वात अफगाणिस्तानला पराभवाचा ‘सामना’ करावा लागला.
झिंबाब्वेचा थरारक विजय
Zimbabwe win a last-ball thriller to take a 1-0 lead in the series ⚡#ZIMvPAK #VisitZimbabwe 📝 https://t.co/EjMJE3pB5B pic.twitter.com/zRVZjkWY9n
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 11, 2024
टीम इंडियाला दणका
टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर झिंबाब्वे दौरा केला होता. झिंबाब्वेने वर्ल्ड कप विनर टीम इंडियाला 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेतील पहिल्या मॅचमध्ये पराभूत केलं होतं. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे 6 जुलैला शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताची पराभवाने सुरुवात झाली होती. झिंबाब्वेने विजयसाठी 116 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र झिंबाब्वेने टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडला 1 बॉलआधी 19.5 ओव्हरमध्ये 102 रन्सवर ऑलआऊट केलं होतं. अशाप्रकारे अफगाणिस्तानच्या पराभवामुळे क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाचाही पराभव आठवला.
झिंबाब्वे प्लेइंग इलेव्हन : सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), डिओन मायर्स, वेस्ली माधेवेरे, रायन बर्ल, वेलिंग्टन मसाकादझा, ताशिंगा मुसेकिवा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि ट्रेव्हर ग्वांडू
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन : राशिद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, हजरतुल्ला झाझाई, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, मोहम्मद इशाक, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फरीद अहमद मलिक.