काय सांगता? क्रिकेटर मोहम्मद शमीची बहीण आणि भावोजी मनरेगाचे मजूर? ही यादी पाहून BCCI ची झोप उडाली
Cricketer Mohammed Shami : क्रिकेटर मोहम्मद शमी याच्या आयुष्यात तुफान, वादळ असं सर्व येऊन गेलंय, कमबॅक केल्यानंतर त्याने तुफानी खेळी करत विश्वचषकात भारतासाठी उत्तम खेळी खेळली. पण आता एक नवीनच वादळ त्याच्या कुटुंबियांच्या जीवनात आले आहे.

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या कुटुंबियाच्या जीवनात एक पेल्यातील वादळ आलं आहे. अनेक माध्यमांनी दावा केला आहे की, मोहम्मद शमी याची बहीण शबीना आणि भावोजी गजनबी यांची नावं थेट मनरेगाच्या मजूरांच्या यादीत समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शबीना हिची सासू गुले आईशा ही सरपंच आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या खात्यात वर्ष 2021 ते 2024 पर्यंतची मजूरी सुद्धा जमा झाली आहे. हे सर्व प्रकरण उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील जोया पंचायत समितीमधील पलोला या गावचे आहे. मोठ्या प्रमाणात सरकारी योजनेत अपहार झाल्याचे हे प्रकरण सध्या मीडियात गाजत आहे.
मनरेगाच्या यादीत बहीण आणि भावोजी
मनरेजा योजनेत या गावात 657 जॉब कार्ड तयार झाले. या यादीत 473 व्या क्रमांकावर शबीना यांचे नाव आहे. शबीना ही गावच्या सरपंचाची सून आहे. शबीनाचे मनरेगा कामाच्या रजिस्टरमध्ये 4 जानेवारी, 2021 रोजी नोंदणी झाली होती. शबीनाच्या बँक खात्यात मनरेगा योजनेतून जवळपास 70 हजार रुपये जमा झाले आहेत. तर शबीना हिच्याप्रमाणेच तिच्या पतीचे गजनवीचे नाव सुद्धा या योजनेच्या लाभार्थ्याच्या यादीत, मजूरांच्या यादीत आहे. या योजनेत काम केले म्हणून त्याच्या नावावर जवळपास 66 हजार रुपये जमा करण्यात आले आहे.




ठेकेदाराने जमवली मोठी माया
मनरेगा घोटाळ्याचे कनेक्शन केवळ शबीना हिच्या घराशीच नाही तर ठेकेदाराशी पण जुळत आहेत. शबीना हिची नणंद नेहा हिचे नाव सुद्धा मनरेगाच्या यादीत आहे. 2019 मध्ये तिचा निकाह झाला होता. लग्नानंतर ती सासरी राहते. पण गावातील मजूरांच्या यादीत तिचे नाव आहे. तर या यादीत ठेकेदार जुल्फिकार याचे नाव आहे. त्याचे या गावात दोन मजली आलिशान घर आहे. याप्रकरणी माध्यमांनी प्रशासनाकडे विचारणा केली, पण अद्याप त्यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. या मनरेगा योजनेतील घोटाळ्याप्रकरणी चौकशीची मागणी करण्यात येत आहे. तर संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.