हार्दिक पांड्या आणि नताशाचं सूत असं जुळलं, नाइट क्लबमध्ये भेट झाली तेव्हा….
क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि सर्बियन अभिनेत्री नताशा यांच्या लव्हस्टोरीबाबत चाहत्यांना कायमच उत्सुकता राहिली आहे. या लव्हस्टोरीबाबत खुद्द हार्दिक पांड्या यानेच एका मुलाखतीत खुलासा केला होता.
मुंबई: क्रिकेटपटू आणि चित्रपटसृष्टीतील तारका यांच्या अनेक लव्हस्टोरी सर्वश्रूत आहेत. नुकतंच बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची कन्या अथिया आणि क्रिकेटपटू केएल राहुल यांचं लग्न धुमधडाक्यात पार पडलं. त्यामुळे चाहत्यांना क्रिकेटपटू आणि बॉलिवूड तारका यांच्या लव्हस्टोरी काही नवीन नाहीत. मात्र या सर्वांत क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि सर्बियन अभिनेत्री नताशा (Natasa Stankovic) यांची लव्हस्टोरी काहीशी वेगळी आहे. हार्दिक आणि नताशा जोडी प्रेम प्रकरणामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. हार्दिकने जानेवारी 2020 मध्ये अभिनेत्री नताशा स्टेनकोविचसोबत साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर काही महिन्यानंतर 31 मे 2020 रोजी लग्नबंधनात अडकले. हार्दिक आणि नताशाची पहिली ओळख एका नाईट क्लबमध्ये झाली होती. हार्दिक पांड्याने एका मुलाखतीत याबाबतच खुलासा केला आहे.
हार्दिक आणि नताशाची अशी झाली भेट
“एका नाईट क्लबमध्ये आमची भेट झाली होती. तिला माहिती नव्हतं की मी कोण आहे? एकमेकांशी बोलता बोलता भेटीचं रुपांतर ओळखीत झालं. जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी हॅट घातली होती. रात्री एक वाजता हॅट घालून, गळ्यात चैन आणि हातात घड्याळ घालून बसलो होतो. तेव्हा तिला मी थोडा विचित्र वाटलो. पण आम्ही आमचं बोलणं सुरुच ठेवलं. त्यानंतर खऱ्या अर्थाने एकमेकांना ओळखू लागलो आणि डेट करणं सुरु केलं.”, असं हार्दिक पांड्यानं मुलाखतीत सांगितलं होतं.
हार्दिकनं केलं प्रपोज
वर्ष 2020 च्या न्यू ईयर पार्टीत हार्दिकनं नताशाला अनोख्या अंदाजात प्रपोज केलं. तसेच अंगठी घालत आपल्या प्रेमाची कबुली दिली. या आनंदी क्षणांचा व्हिडीओ हार्दिक पांड्याने शेअर करत लिहिलं होतं की, “मे तेरा तू मेरी, जाने सारा हिंदुस्तान”. या पोस्टनंतर चाहते आणि मित्रांना आश्चर्याचा धक्का बसला होता. हार्दिकने मुलाखतीत पुढे सांगितलं होतं की, “माझ्या आई वडिलांना माहिती नव्हतं की मी नताशासोबत साखरपुडा करणार आहे. इतकंच काय तर माझा भाऊ कृणाल पांडाला मी दोन दिवसांपूर्वी याबाबत सांगितलं होतं.” 2020 च्या लॉकडाऊनमध्ये हार्दिक आणि नताशानं लग्न केलं आमि 31 मे 2020 रोजी आपल्या चाहत्यांना खूशखबर दिली. 30 जुलै 2020 रोजी नताशानं बाळाला जन्म दिला. या बाळाचं नाव अगस्त्य ठेवलं आहे.
हार्दिक पांड्याची क्रिकेट कारकिर्द
हार्दिक पांड्या भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. हार्दिक पांड्याने आतापर्यंत 11 कसोटी, 71 एकदिवसीय, 87 एकदिवसीय आणि 107 आयपीएल सामने खेळला आहे. कसोटीत 1 शतकासह 532 धावा, वनडेत 9 अर्धशतकांसह 1518 धावा, टी 20 तीन अर्धशतकांसह 1271 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत कसोटीत 17, वनडेत 68 आणि टी 20 69 गडी बाद केले आहेत.