थरारक सामन्यात भारताचा विजय, मोहम्मद शमीची शानदार हॅट्ट्रिक
या थरारक सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमरा, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन, तर मोहम्मद शमीने चार फलंदाजांना माघारी धाडत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि हॅट्ट्रिकही घेतली.
लंडन : अत्यंत थरारक सामन्यात भारताने विश्वचषकातला सलग चौथा विजय मिळवला. अफगाणिस्तानवर 11 धावांनी मात करुन भारताने आपला विजयरथ कायम राखला. मोहम्मद शमीने हॅट्ट्रिक घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं. मात्र अफगाणिस्ताननेही भारताला विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत संघर्ष करायला लावला. अगोदर भारताला 224 धावात रोखलं आणि त्यानंतर शानदार फलंदाजी करत भारताची धाकधूक वाढवली. मात्र गोलंदाजांनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत विजय खेचून आणला. या थरारक सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमरा, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन, तर मोहम्मद शमीने चार फलंदाजांना माघारी धाडत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि हॅट्ट्रिकही घेतली.
त्याअगोदर भारताने अफगाणिस्तानला विजयासाठी 225 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारेल असा अंदाज लावला जात असला तरी अफगाणिस्तानच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाजी चालली नाही. सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र विराट 67 धावांवर बाद झाला आणि मोठी धावसंख्या उभी राहण्याची आशा मावळली. लोकेश राहुल 30, विजय शंकर 29, एमएस धोनी 28 आणि केदार जाधवने 52 धावांचं योगदान दिलं.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला संघर्ष करायला भाग पाडलं. मुजीब उर रेहमानने 10 षटकांमध्ये केवळ 26 धावा देत एका फलंदाजाला माघारी धाडलं. गुलबदीन नायब आणि मोहम्मद नाबी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर राशीद खान, रहमत शाह आणि अफ्ताब आलम यांनीही प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं.
जेव्हा नेदरलँडने भारताला 204 धावांवर रोखलं होतं
दरम्यान, कमकुवत मानल्या जाणाऱ्या संघाविरुद्ध अशी डळमळीत परिस्थिती होण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2003 च्या विश्वचषकातही असाच प्रकार घडला होता. अत्यंत कमकुवत मानल्या जाणाऱ्या नेदरलँडने भारतीय संघाला सर्वबाद 204 धावात रोखलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नेदरलँडला भारताने 136 धावात गुंडाळलं आणि 68 धावांनी विजय मिळवला होता.
… आणि धोनीने बदला घेतला
वन डे करिअरमध्ये 200 वेळा दुसऱ्या फलंदाजांना स्टम्प आऊट करणारा धोनी स्वतःच स्टम्प आऊट झाला. धोनीने अशा पद्धतीने बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे. धोनीचा हा 345 वा वन डे आहे. राशीद खानच्या गोलंदाजीवर धोनी 28 धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे धोनीने याच सामन्यात बदला घेत राशीदलाही स्टम्प आऊट केलं. यापूर्वी 20 मार्च 2011 रोजी विश्वचषकातच वेस्ट इंडिजविरुद्ध धोनी स्टम्प आऊट झाला होता.