स्टार बॅटरची अचानक निवृत्तीची घोषणा, क्रिकेट विश्वात एकच खळबळ!
क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. या खेळाडूच्या निर्णयाने सर्वच शॉक, तडकाफडकी घेतला क्रिकेट सोडण्याचा निर्णय
मुंबई : क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडला पहिलं विश्वजेतेपद जिंकून देणाऱ्या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. 2019 साली इंग्लंडला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या इयॉन मॉर्गनने याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. मॉर्गनने गेल्या वर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळत होता. आता त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती घेतली आहे.
2019 साली इंग्लंडला इयॉन मॉर्गनने पहिला वर्ल्ड कप त्याच्या नेतृत्त्वाखाली जिंकून दिला होता. वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला फार काही धावा करता आल्या नव्हत्या. त्यामुळे मॉर्गनने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता. मॉर्गननंतर आता जॉस बटलरकडे संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रत्येक खेळाडूप्रमाणे माझ्या कारकिर्दीतही चढ-उतार आले, पण या काळात माझे कुटुंब आणि मित्र माझ्यासोबत होते. मी माझी पत्नी तारा, माझे कुटुंब आणि जवळच्या मित्रांचे विशेष आभार मानू इच्छितो. मला माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक, चाहते आणि त्या प्रत्येकाचे आभार मानायचे आहेत ज्यांनी पडद्यामागे राहून मला पाठिंबा दिला, असं पोस्टमध्ये मॉर्गनने म्हटलं आहे.
— Eoin Morgan (@Eoin16) February 13, 2023
आताच झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक लीग SA20 मध्ये मॉर्गन खेळताना दिसला होता. या लीगमध्ये पार्ल रॉयल्स संघाचा भाग होता. त्याने या लीगमध्ये एकूण 128 धावा 145.45 च्या स्ट्राइक रेटने केल्या. मॉर्गनची ही क्रिकेटमधील शेवटची लीग ठरली. मॉर्गन निवृत्तीनंतरही क्रिकेटशी जोडलेला असणार आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, मी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असलो तरी मी कायम खेळाशी कनेक्ट राहणार आहे. समालोचक आणि विश्लेषक म्हणून आता नव्या भूमिकेत दिसणार असल्याचं मॉर्गनने सांगितलं आहे.
दरम्यान, इयॉन मॉर्गनने 16 शतके आणि 64 अर्धशतकांसह 10,858 धावा केल्या. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. इतकंच नाहीतर इंग्लंडकडून टी-20 आणि वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये मॉर्गन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने टी20 मध्ये 2,458 आणि वनडेमध्ये 6907 धावा केल्या आहेत. मॉर्गनने 126 सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केलं आहे. यामधील त्याने 76 जिंकले आहेत.