Ind vs Pak T20 World Cup : टीम इंडियाने केला विजयाचा श्रीगणेशा, पाकिस्तानला चारली पराभवाची धूळ
वर्ल्ड कपमधील टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
केपटाऊन : वर्ल्ड कपमधील टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या दोन कट्टर संघामध्ये न्यूलँड केपटाऊन इथे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत स्पर्धेत विजय सलामी दिली. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने हे आव्हान 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाकडून जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक 53 धावा केल्या. पहिला सामना जिंकत भारताने विजयाने मिशन वर्ल्ड कपची सुरूवात केली.
पाकिस्तान संघाने दिलेल्या 150 धावांचा पाठालाग करताना भारतीय संघाने सावध सुरूवात केली होती. यास्तिका भाटिया बाद झाल्यावर जेमिमा रॉड्रिग्जने मैदानावर अखेरपर्यंत थांबत संघाला विजय मिळवून दिला. शफाली वर्मा बाद झाल्यावर कर्णधार हरमनप्रीत मैदानावर आली.
जेमिमा आणि हरमनप्रीत यांनी विजयाचा पाया रचला. दोघींची भागीदारी महत्त्वाची ठरली. मात्र मोठा शॉट मारण्याचा नादात हरमनप्रीत 33 धावांवर बाद झाली. त्यानंतर भारतावर दबाव झालेला दिसत होता. मात्र युवा रिचा घोषने 18 ओव्हरमध्ये सलग तीन चौकार मारत पुन्हा सामना भारताच्या बाजुने झुकवला.
रिचाने 20 बॉलमध्ये 31 धावांची खेळी केली. यामध्ये तिने पाच चौकार मारले. दुसरीकडे जेमिमाने 38 बॉलमध्ये 53 धावांची विजयी खेळी केली. संयम ठेवत जेमिमाने हरमनप्रीत कौर आणि रिचासोबत भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानची सुरूवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकामध्ये दीप्ती शर्माने सलामीवीर जवेरिया खानला 8 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार बिस्माहने मैदानावर तळ ठोकला. मुनीबा अलीला 12 धावांवर राधा यादवने माघारी पाठवलं. चौथ्या नंबरवर आलेल्या निदा दारला पूजा वस्त्राकरने भोपळाही फोडू दिला नाही.
सिद्रा अमीनही फार काही वेळ मैदानात टिकली नाही. राधा यादवने तिला 11 धावांवर बाद केलं, त्यानंतर आलेल्या आयशा नसीमने आक्रमक पवित्रा घेतला. आयशा आणि बिस्माह या जोडीने भारतीय गोलंदाजांचा घाम फोडला. बिस्माहने अर्धशतकी 68 धावांची महत्त्वाची खेळी केली. आयेशाने अवघ्या 25 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या. आयशा आणि बिस्माह यांच्या 47 बॉलच्या 81 धावांची भागीदारी करत संघाला 150 धावसंख्येपर्यंत पोहोचवलं होतं.
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.
पाकिस्तानः बिस्माह मारूफ (कर्णधार), आलिया रियाझ, आयमान अन्वर, आयशा नसीम, फातिमा सना, जवेरिया खान, मुनीबा अली, सदफ शम्स, नशरा संधू, निदा दार, ओमामा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन.