IND vs Aus 1st Test: कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला मोठा फटका, हा खेळाडू मैदानातून थेट रुग्णालयात
India vs Australia 1st Test: भारताने दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या धावांना मागे टाकत आघाडी घेतली आहे. हिटमॅन रोहित शर्मानं कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करत शतक ठोकलं आहे. त्यामुळे भारत आता भक्कम स्थितीकडे वाटचाल करत आहे.
नागपूर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये सुरु आहे.पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा सर्व संघ 177 या धावसंख्येवर सर्वबाद झाला होता.सामन्याचा दुसरा दिवस सुरु 177 धावांचा टप्पा ओलांडून 45 हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.भारताची स्थिती भक्कम होत असताना कांगारुंना सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जबर फटका भसला आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅट रेनशॉ वॉर्मअप करताना जबर जखमी झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मैदानात खेळण्याऐवजी त्याची रवानगी थेट रुग्णालयात करण्यात आली आहे. मॅट रेनशॉच्या जागी एश्टन एगर मैदानात क्षेत्ररक्षण करत आहे. त्यामुळे आता सामन्याच्या उर्वरित दिवसात मैदानात उतरेल की नाही याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.पहिल्या डावात फलंदाजी करताना रेनशॉ भोपळाही फोडू शकलेला नाही. रविंद्र जडेजाने त्याला पायचीत करत थेट तंबूचा रस्ता दाखवला होता.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत माहिती देत सांगितलं आहे की, “रेनशॉ दुसऱ्या दिवशीच्या खेळ सुरु होण्यापूर्वी करत असलेल्या सरावादरम्यान जखमी झाला आहे. त्याच्या गुडघ्याला जबर दुखापत झाली आहे. त्यासाठी त्याला वीसीए स्टेडियममधून थेट स्कॅन करण्यासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्या ऐवजी मैदानात एश्टन एगर क्षेत्ररक्षण करत आहे.”
ऑस्ट्रेलियन संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने संघाची चिंता वाढली आहे. अष्टपैलू कॅमरन ग्रीन आणि मिचेल स्टार्क बोटाच्या दुखापतीमुळे नागपूर कसोटीला मुकले आहेत. दुसरीकडे जोश हेझलवूडदेखील दुखापतग्रस्त असल्याने चिंता वाढली आहे. आता यामध्ये मॅट रेनशॉ याची भर पडली आहे.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
ऑस्ट्रेलियाकडून एकही खेळाडू खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. पण दुसऱ्या षटकातच ऑस्ट्रेलियाला उस्मान ख्वाजाच्या रुपाने पहिला धक्का बसला. मोहम्मद सिराजनं त्याला अवघ्या एका धावेवर पायचीत केलं.त्यानंतर लगेचच तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजनं डेविड वॉर्नरला बाद केलं. ऑस्ट्रेलियन संघ दबावात असताना मार्सन लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ जोडीनं डाव सावरला. तिसऱ्या गड्यासाठी 82 धावांची भागीदारी केली. मात्र केएस भारतनं चपळतेने केलेल्या स्टंपिंग करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेला मॅट रेनशॉ भोपळाही फोडू शकला नाही. जडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. स्टीव स्मिथ 37, एलेक्स कॅरे 36, पॅट कमिन्स 6, टोड मर्फी 0, पीटर हँडस्कॉम्ब 31, स्कॉट बोलँड 1 अशा धावा करून बाद झाले.
इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11 : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.