IPL 2022 : उर्वरीत पाच सामने कोणत्याही दबावाशिवाय आणि भीतीशिवाय खेळण्याची गरज आहे – श्रेयस अय्यर
आम्ही खूप संथ सुरुवात केली आणि काही विकेट लवकर गमावल्या. सुरुवातीला विकेटमध्ये थोडी हालचाल होती. तरीही मला मान्य आहे की या विकेटवर आम्ही प्रथम फलंदाजी केली आणि कमी धावा केल्या.
मुंबई – आयपीएलमध्ये (IPL 2022) गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) पुन्हा एकदा पराभव झाला. दिल्ली कॅपिटल्स (DC) ने कोलकाता नाईट रायडर्सचा 4 गडी राखून पराभव केला. कोलकाताचा या मोसमातील हा सलग पाचवा पराभव ठरला. या पराभवानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर काहीसा निराश दिसला. त्याने आपल्या संघाची संथ सुरुवात आणि सुरुवातीलाच विकेट गमावणे हे पराभवाचे कारण सांगितले. यासोबतच या सलग पराभवानंतर संघाला काय करण्याची गरज आहे हेही सांगितले.
आमच्या खेळाचे विश्लेषण करावे लागेल
आम्ही खूप संथ सुरुवात केली आणि काही विकेट लवकर गमावल्या. सुरुवातीला विकेटमध्ये थोडी हालचाल होती. तरीही मला मान्य आहे की या विकेटवर आम्ही प्रथम फलंदाजी केली आणि कमी धावा केल्या. पूर्वार्धात आम्ही चांगला खेळ केला नाही. चूक कुठे होत आहे हे पाहण्यासाठी आम्हाला आमच्या खेळाचे विश्लेषण करावे लागेल. या सामन्यातही केकेआरच्या सलामीच्या जोडीत बदल झाला असं श्रेयस अय्यर म्हणाला. गेल्या काही सामन्यांपासून आम्ही आमची सलामीची जोडी फिक्स करू शकलो नाही. काही खेळाडूंना सामन्यांच्या मध्यभागी दुखापत झाल्याचे कारणही आहे. स्थिर फलंदाजी आणि गोलंदाजीची फळी राखणे कठीण झाले आहे. जेव्हा तुम्ही लीग खेळत असाल तेव्हा तुमच्याकडे सुरुवातीपासूनच फलंदाजी आणि गोलंदाजी यांचा चांगला मेळ असायला हवा असंही तो म्हणाला.
पाच सामने बाकी आहेत
‘आता आम्हाला कोणत्याही दबावाशिवाय आणि भीतीशिवाय सामना खेळण्याची गरज आहे. आमचे पाच सामने बाकी आहेत. अशा परिस्थितीत आम्हाला आमच्या फ्रँचायझीसाठी सर्व शक्तीनिशी सामने जिंकावे लागतील. खेळाडूंना जास्त विचार करणे थांबवावे लागेल. आपण पुन्हा चांगली सुरुवात करूया. हे सर्व मानसिकतेवर अवलंबून असते. आता आपल्याला अतिआत्मविश्वास दाखवायला हवा. अशा वेळी तुमची चूक असली तरी हरकत नाही असं म्हणत श्रेयसने खेळाडूंना आधार दिला.
केकेआरचा हा सलग पाचवा पराभव
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 35 धावांत चार विकेट गमावल्या. नंतर कर्णधार श्रेयस अय्यर (42) आणि नितीश राणा (57) यांच्या खेळीमुळे कोलकाताचा संघ 146 धावा करू शकला. प्रत्युत्तरात दिल्लीनेही पहिले दोन विकेट लवकर गमावल्या. पण नंतर डेव्हिड वॉर्नर (42), ललित यादव (22), रोवमन पॉवेल (33) आणि अक्षर पटेल (24) यांच्या छोट्या खेळीने संघाला सहज विजय मिळवून दिला.