IPL चं बिगुल वाजल्यावर CSK ला धक्का तर RCB साठी गुड न्यूज, नेमकं काय झालं?
आयपीएलची क्रिकेट चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते, मात्र आयपीएल सुरू होण्याआधीच या लीगमधील दोन मोठ्या संघांबाबत एक अपडेट समोर आली आहे.

मुंबई : IPLचं बिगुल वाजलं असून 16 व्या हंगामाचं वेळापत्रक समोर आलं आहे. आयपीएलचा पहिला सामना 31 मार्चला सुरू होणार आहे. पहिला सामना गतवर्षी विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. आयपीएलची क्रिकेट चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते, मात्र आयपीएल सुरू होण्याआधीच या लीगमधील दोन मोठ्या संघांबाबत एक अपडेट समोर आली आहे.
आयपीएलमधील दुसरा सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाबाबत एक बातमी आहे. यातील आरसीबीसाठी समाधानकारक तर सीएसकेसाठी वाईट बातमी आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जेमिसन हा पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या हंगामामधून बाहेर पडला आहे. मागील 6 ते 7 महिन्यांपासून तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आताच पार पडलेल्या न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेआधी झालेल्या सराव सामन्यात जेमीसन खेळला होता. मात्र त्यानंतर कसोटी सामन्यामधून त्याला बाहेर पडावं लागलं होतं.
आरसीबीसाठी आनंदाची बातमी
आरसीबीसाठी आनंदाची बातमी आहे की ऑस्ट्रेलियाच्या संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल फिट झाला आहे. देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमध्ये मॅक्सवेलने पुनरागमन केलं आहे. एका पार्टीवेळी मॅक्सवेलच्या पायाला दुखापत झाली होती त्यामुळे त्याला क्रिकेट सामन्यांना मुकावं लागलं होतं. आयपीएलमध्ये आरसीबी संघाचा ग्लेन मॅक्सवेल हा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे.
दरम्यान, 16 व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. एकूण 10 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या 10 संघाची विभागणी ही ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा 2 गटांमध्ये करण्यात आली आहे. या हंगामाती सर्व सामन्यांचं आयोजन हे देशातील एकूण 12 स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मुंबईचा या मोसमातील सलामीचा सामना हा बंगळुरु विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 2 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.