रवी शास्त्री यांचा एक सल्ला, टीम इंडियाच्या स्टार बॉलरने निवृत्ती घेतली मागे!
स्टींग ऑपरेशनमुळे आधीच खळबळ माजली असताना एक मोठी माहिती समोर आली आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी केलेल्या दाव्यांमुळे क्रीडा वर्तुळात भूकंप आला आहे. वृत्तवाहिनीने केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी मोठ्या खेळाडूंची नावे घेतली आहे. इतकंच नाहीतर यामध्ये स्टार बॉलर जसप्रीत बुमराहचंही नाव समोर येत आहे. या स्टींग ऑपरेशनमुळे आधीच खळबळ माजली असताना एक मोठी माहिती समोर आली आहे. भारताचे माजी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी सल्ला दिला नसता तर भारताचा स्टार बॉलर आता संघात दिसला नसता.
भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण यांनी याबाबत खुलासा केला आहे. 2018 साली भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होता. याबाबत शमीने भरत अरूण यांच्या खोलीत जात निवृत्तीबाबत सांगितलं. त्यावेळी भरत अरूण यांनी शमीला रवी शास्त्री यांच्याकडे नेलं. मोहम्मद शमीचा मानसिक स्थिती खालावली होती. त्यावेळी 2018 सालच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वीच्या फिटनेस चाचणीत अपयशी ठरला होता.
काय म्हणाले शास्त्री?
भरत अरूण यांनी रवी शास्त्री यांच्याकडे शमीला नेलं आणि त्याच्या निवृत्तीबाबत सांगितलं. त्यावेळी, जर तू क्रिकेट खेळला नाहीस तर तू काय करशील, क्रिकेटसोडून तुला दुसरं काही येत का? असं विचारलं. त्यानंतर रवी शास्त्री यांनी शमीच्या हातात बॉल दिला आणि त्याला सांगितलं, तुझा फिटनेस खराब आहे मग तुझी जी काही नाराजी आहे ती बाहेर काढ. तुला माहित आहे बॉलिंग कशी करायची, असं भरत अरूण यांनी सांगितलं.
रवी शास्त्री यांनी मोहम्मद शमीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवलं होतं. रवी शास्त्री यांनी त्यावेळी शमीला रोखलं नसतं तर आज भारताने मोठा प्लेअर गमावला असता. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये शमीने चमकदार कामगिरी केली होती. अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात शमीने हॅट्रीक घेतली होती. आगामी वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमी भारताच्या मुख्य गोलंदाजांपैकी एक खेळाडू आहे.
दरम्यान, मोहम्मद शमी यानेआत्तापर्यंत 61 कसोटी सामने खेळले असून यामध्ये 219 विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यामध्ये 87 सामन्यांमध्ये 159 विकेट्स तर 23 टी-20 सामन्यांमध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत.