धारावीत प्रसिद्ध कबड्डीपटूची डोक्यात स्टम्पस घालून हत्या, 5 वाजेपर्यंत रक्ताच्या थारोळ्यात पडून होता
धारावीत एका प्रसिद्ध कबड्डीपटूची (Kabbadi palyer) डोक्यात स्टम्पस घालून हत्या करण्यात आली. विमल राज नाडार असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
मुंबई: धारावीत एका प्रसिद्ध कबड्डीपटूची (Kabbadi palyer) डोक्यात स्टम्पस घालून हत्या करण्यात आली. विमल राज नाडार असं मृत व्यक्तीचं नाव आहे. कबड्डीच्या खेळातून विमल राज नाडारने (Vimal Raj Nadar) विभागात स्वत:ची ओळख निर्माण केली होती. विमल राज 26 वर्षांचा होता. तो धारावीच्या 90 फिट रोडवर कामराज चाळी मध्ये रहायचा. शनिवारी पहाटेच्या सुमारास हा दुर्देवी घटना घडली. मालेश चिताकांडी (32) (Malesh Chitakandi) असं आरोपीचं नाव असून तो विमल राजच्या शेजारीच रहायचा. आरोपी मालेश आणि त्याचा मित्र विमल राजच्या घराबाहेर मोठ्या आवाजात बोलत होते. ते विमल राज नाडारच्या झोपे मध्ये व्यत्यय आणत होते. त्यावरुन या वादाला सुरुवात झाली.
सातत्याने खटके उडायचे
“आरोपी मालेश आणि विमल राज मध्ये आधीपासूनच पटत नव्हतं. दोघांमध्ये वाद होते. त्यांच्यामध्ये सातत्याने खटके उडायचे” असं धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी सांगितलं.
नेमकं त्यावेळी काय घडलं?
“शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास मालेश आणि त्याचा मित्र विमल राजच्या घराबाहेर बसले होते. ते मोठ मोठ्याने बोलत होते. त्यामुळे विमल राज नाडारची झोप मोड होत होती. त्यामुळे विमल राज घराबाहेर आला व त्यांना खडसावलं. त्यांना तिथून निघून जाण्यास सांगितलं. विमल राज आणि मालेश मध्ये मारामारी सुरु झाली. मालेशचा मित्र आणि नाडारच्या नातेवाईकाने मध्ये पडून वाद थांबवला. त्यानंतर मालेश तिथून निघून गेला” असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी सांगितलं.
विमल राज तिथे 5 वाजेपर्यंत पडून होता
“काही मिनिटांनी.मालेश चिताकांडी पुन्हा तिथे आला. त्याच्या हातात स्टम्प होता. त्याने थेट विमल राज नाडारच्या डोक्यात तो स्टम्प घातला. विमल राज जागीच कोसळला. मालेश त्यानंतर तिथून निघून गेला” असं पोलिसांनी सांगितलं. विमल राज तिथे 5 वाजेपर्यंत पडून होता. स्थानिकांनी त्याला पाहिल्यानंतर जवळच्या सायन रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केलं.