अक्षिता स्वामीची उल्लेखनीय कामगिरी, ऑस्ट्रिया दौऱ्यासाठी निवड
Akshita Swami : टीव्ही9 नेटवर्कच्या "इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस" मोहिमेअंतर्गत हरयाणातील अक्षिता स्वामी हीची ऑस्ट्रिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. अक्षिता दिग्गज प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात ऑस्ट्रियामध्ये फुटबॉलचे धडे गिरवणार आहे.

भारतात गेल्या काही वर्षांत क्रिकेटसह इतर खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळालं आहे. भारतात असंख्य प्रतिभावान फुटबॉलपटू आहेत. मात्र त्यांना योग्य व्यासपीठ आणि प्रशिक्षण न मिळाल्याने ते मुख्य प्रवाहापासून वंचित राहिले. या अशाच प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्यासाठी न्यूज9 कडून ‘इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस’ मोहिम राबवण्यात आली. टीव्ही 9 नेटवर्कच्या या मोहिमेअंतर्गत या अनेक खेळाडूंना दिग्गजांकडून प्रशिक्षण मिळालं. आता टीव्ही 9 नेटवर्कच्या या मोहिमेला यश मिळालं आहे. हरियाणाच्या अक्षिता स्वामी हीची युरोपमधील सर्वोत्तम प्रशिक्षकांसोबत प्रशिक्षण घेण्यासाठी निवड झाली आहे. त्यानुसार अक्षिता ऑस्ट्रियाला जाणार आहे.
टीव्ही9 नेटवर्कच्या आवाहनानंतर देशभरातील 8 स्काउटिंग कॅम्पमधून 16 हजार शाळांमधील मुलांनी फुटबॉल खेळण्यासाठी रुची दाखवली. त्यानुसार 50 हजार विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली. त्या 50 हजार विद्यार्थ्यांमधून 3 हजार मुली आणि 7 हजार मुलींची निवड करण्यात आली. त्यानंतर प्रादेशिक पातळीवर अनेक सामने झाले. या सामन्यांनंतर अंतिम फेरीसाठी 32 जणांची निवड करण्यात आली. त्यातून अक्षिता स्वामीची युरोपमधील सर्वोत्तम प्रशिक्षकांसोबत प्रशिक्षणासाठी निवड झाली.
मुलीच्या यशात वडिलांचं योगदान
अक्षिता गुरुग्राममधील नाखरोला अकादमीसाठी खेळते. अक्षितासाठी फुटबॉल हा फक्त एक खेळ नसून भावना, छंद असं खूप काही आहे. अक्षिताच्या इथवर पोहचण्यामागे तिच्या वडिलांचं मोठं योगदान आहे. अक्षिताचे वडील हेच तिचे गुरु आहेत. अक्षिताने वडिलांच्या मार्गदर्शनातच फुटबॉलची बाराखडी गिरवली आहे. वडिलांनी अक्षिताला फुटबॉलचे धडे दिले. त्यामुळेच अक्षिताचा फुटबॉलपटू म्हणून पाया भक्कम झालाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
गुरुग्राम ते ऑस्ट्रिया, अक्षिताचा उल्लेखनीय प्रवास
गुरुग्रामच्या अक्षिताला इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेमुळे युरोपातील काही सर्वोत्तम प्रशिक्षकांसोबत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. अक्षिताला यामुळे फुटबॉलमधील अनेक बारकावे समजण्यास मदत होणार आहे,यात काडीमात्र शंका नाही. तसेच अक्षिताला या संधीचा आणि प्रशिक्षणाचा भविष्यातही निश्चितच फायदा होईल.
अक्षिता आव्हानासाठी सज्ज
अक्षिताची या प्रशिक्षणासाठी निवड होणं हे तिच्या वडिलांच्या स्वप्नपूर्ती आहे. आपल्या मुलीची निवड झाल्याने अक्षिताच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच आता अक्षिताच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.