Paris Olympic 2024 : सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने उपांत्य फेरी गाठली, ग्रेट ब्रिटेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये उडवला धुव्वा
पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेतील हॉकीमध्ये भारत आणि ग्रेट ब्रिटेन यांच्यात अतितटीचा सामना झाला. भारताने ग्रेट ब्रिटेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने धुव्वा उडवला. या सामन्यात गोलकीपर श्रीजेश यांचा बचाव सर्वात महत्त्वाचा ठरला. त्यामुळे भारताने उपांत्य फेरी गाठली आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील हॉकीत भारताने आपल्या चमकदार कामगिरीचं दर्शन घडवलं. 60 मिनिटांचा खेळ भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढवणारा होता. प्रत्येक मिनिटाला काही ना काही घडत होतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये अस्वस्थता वाढत होती. पहिला सत्रात दोन्ही संघांनी जबरदस्त झुंज दिली. त्यामुळे या सत्रात 0-0 अशी बरोबरी होती. त्यानंतर दुसऱ्या सत्रात भारताला धक्का बसला. दुसऱ्या मिनिटाला म्हणजेच सामन्याच्या 17 व्या मिनिटला अमित रोहितदास याला रेड कार्ड दाखवण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण सामन्यात भारताला एका खेळाडूशिवाय खेळावं लागलं. त्यामुळे उर्वरित संपूर्ण सत्रात भारत बचावात्मक पवित्रात गेला. दुसऱ्या सत्रात कर्णधार हरमनप्रीत कौरने पेनल्टी शूटआऊटचं गोलमध्ये रुपांतर केलं आणि दबाव वाढवला. पण त्यानंतर ब्रिटेनने पुन्हा गोल करत 1-1 अशी बरोबरी केली. त्यानंतर भारतीय संघ वारंवार अडचणीत येत होता. पण द वॉल म्हणून हॉकीत प्रसिद्ध असलेल्या श्रीजेशने कमाल केली. ग्रेट ब्रिटेनचे सर्व हल्ले परतावून लावले. त्यामुळे ग्रेट ब्रिटनचे खेळाडू अस्वस्थ झाले होते. अखेरच्या मिनिटांपर्यंत त्यांनी गोल करण्यासाठी झुंज दिली. पण भारताच्या खेळाडूंनी त्यांना गोल करू दिला नाही. त्यामुळे हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. श्रीजेशसारखी तगडी भिंत असताना भारतीय क्रीडाप्रेमींना विश्वास होता की हा सामना आपणच जिंकू आणि झालंही तसंच..
ग्रेट ब्रिटेन संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये पहिली संधी मिळाली. 8 सेंकदाच्या या कालावधीत गोल करणं आणि बचाव करणं महत्त्वाचं असतं. यावेळी त्यांनी गोल केला आणि भारतावर दबाव वाढला होता. पण कर्णधार हरमनप्रीत कौरने गोल करत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर ग्रेट ब्रिटेनने पुन्हा एका गोल केला आणि 2-1 अशी आघाडी घेतली. भारताने पुन्हा एकदा गोल करत 2-2 अशी बरोबरी केली. इथपर्यंत सर्व ठीक होतं. त्यानंतर गोलकीपर श्रीजेशने कमाल करत तिसरा गोल अडवला आणि भारतीय क्रीडाप्रेमींच्या जीवात जीव आला. त्यानंतर भारताने तिसरा गोल मारत 3-2 अशी आघाडी घेतली. द वॉल श्रीजेशने चौथा गोल अडवला आणि भारताच्या विजयाच्या आशा वाढल्या. राजकुमारने चौथा गोल मारला आणि भारताला 4-2 अशी आघाडी मिळाली आणि विजय झाला. या सामन्यात विजयाचा शिल्पकार खऱ्या अर्थाने ठरला तो गोलकीपर श्रीजेश..
भारताने टोक्यो ऑलिम्पिकनंतर दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. भारताने या सामन्यात विजय मिळवला तर एक पदक निश्चित होणार आहे. जर पराभव झाला तर मात्र कांस्य पदकासाठी लढाई करावी लागेल. पण भारताचा सुवर्ण पदकावरच निशाणा असेल यात शंका नाही. मागच्या पर्वात भारताने कांस्य पदक मिळवलं होतं.