Paris Olympics 2024: हॉकी उपांत्यपूर्व फेरीत भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटेन सामना, जाणून घ्या कधी आणि केव्हा सामना सुरु होणार
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी अजूनही हवी तशी झालेली नाही. काही स्पर्धेत मेडलच्या अगदी जवळ येऊन थांबले. त्यामुळे पदरी निराशा पडली आहे. मनु भाकरही तिसऱ्या मेडलपासून काही गुणांनी चुकली. दुसरीकडे, भारताला नीरज चोप्रा आणि हॉकी संघाकडून अपेक्षा आहेत. भारताचा महत्त्वाचा सामना ग्रेट ब्रिटेनसोबत आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेतील हॉकीमध्ये भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. साखळी फेरीत भारताने जबरदस्त कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारताने पाच पैकी तीन सामन्यात विजय, एका सामन्यात पराभव आणि एक सामना बरोबरीत सोडवला आहे. यासह गट ब मध्ये दुसरं स्थान गाठलं आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना ग्रेट ब्रिटेनसोबत होणार आहे. या सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीत गाठणार आहे. तसं पाहिलं तर भारतीय संघ पदकापासून दोन विजय दूर आहे. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत विजय मिळवला तर पदक निश्चित होईल. त्यामुळे ग्रेट ब्रिटेनविरुद्धचा सामना खूप महत्त्वाचा आहे. भारताचा सामना भारतीय वेळेनुसार 4 ऑगस्टला दुपारी 1.30 वाजता होणार आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत भिडले होते. तेव्हा भारताने ग्रेट ब्रिटेन संघाला 3-1 ने पराभूत केलं होतं. यावेळेस भारतीय संघाची कामगिरी पाहता तसंच काहीसं अपेक्षित आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील साखळी फेरीत ग्रेट ब्रिटेन संघाने ठिकठाक कामगिरी केली आहे. पाच सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय, दोन सामने बरोबरी आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. भारताचा ग्रेट ब्रिटेन संघासोबत मागच्या तीन सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. त्यामुळे या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण असं असलं तरी सामन्याच्या दिवशी कोणता संघ चांगली कामगिरी यावर हार जीत ठऱेल.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने सर्वाधिक सहा गोल केले आहेत. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. साखळी फेरीत भारताने न्यूझीलंडला 3-2 पराभूत केलं. अर्जेंटिनाविरुद्धचा सामना 1-1 ने बरोबरीत सुटला. भारताने तिसऱ्या सामन्यात आयर्लंडला 2-0 ने पराभूत केलं. बेल्जियमकडून 2-1 ने पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर ऑस्ट्रेलियाला 3-2 पराभूत केलं. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. आता भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.