Vinesh Phogat disqualified: अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटसाठी मोदींचं खास ट्विट; म्हणाले..
ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटाच्या फायनल्समध्ये विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास ट्विट केलं आहे. फायनलपूर्वी काही ग्रॅम्सने वजन जास्त भरल्याने विनेशला अपात्र ठरवलं गेलंय.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीसाठी कुस्तीगीर विनेश फोगट अपात्र ठरली आहे. विनेशने मंगळवारी उपांत्य फेरीत क्यूबाच्या युस्नेलिस गुझमान लोपेझचा 5-0 गुणांनी पराभव केला होता. विनेशच्या या कामगिरीने भारताचं स्पर्धेतील चौथं पदक निश्चित झालं होतं. मात्र आता अंतिम सामन्यापूर्वी ती अपात्र घोषित झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. फायनलच्या दिवशी विनेशचं वजन काही ग्रॅम्सने जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं आहे. ही बातमी कळताच त्यावर विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेशसाठी ट्विट केलं आहे. ‘तू भारताचा अभिमान आहेस’, असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट-
‘विनेश, चॅम्पियन्समध्ये तू चॅम्पियन आहेस. तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आजच्या धक्क्याने मन दुखावलं. मी अनुभवत असलेल्या निराशेची भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाही. त्याचवेळी मला माहित आहे की तू लवचिकतेचं प्रतीक आहेस. आव्हानं स्वीकारणं हा तुझा नेहमीचा स्वभाव राहिला आहे. आणखी मजबूत बनून परत ये. आम्ही सर्वजण तुझ्या पाठिशी आहोत,’ असं त्यांनी लिहिलंय.
Vinesh, you are a champion among champions! You are India’s pride and an inspiration for each and every Indian.
Today’s setback hurts. I wish words could express the sense of despair that I am experiencing.
At the same time, I know that you epitomise resilience. It has always…
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2024
विनेशने मोदींविरोधात दिल्या होत्या घोषणा
गेल्या वर्षी कुस्तीपटूंनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला होता. कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण यांच्यावर आरोप करण्यात आला होता की त्यांनी सहा महिला कुस्तीगीरांचं शोषण केलं आहे. कुस्तीपटूंनी या मुद्द्यावरून जोरदार आंदोलन आणि निदर्शनं केली होती. त्यावेळी विनेश फोगटने तिचे सर्व मेडल्स आणि पुरस्कार आणून रस्त्यावर ठेवले होते. तिने वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य न झाल्याने तिने मोदींविरोधात ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’च्या घोषणाही दिल्या होत्या.
अस्तित्वाची लढाई..
पहिल्या 2016 रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत 48 किलो वजनी गटातून खेळताना विनेशला दुखापतीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर 2020 टोक्यो स्पर्धेत विनेश 53 किलो वजनी गटात नवव्या स्थानावर राहिली होती. मानसिक दडपण आणि स्पर्धेदरम्यान झालेल्या अंतर्गत कलहाचा विनेशच्या कामगिरीवर परिणाम झाला होता. परंतु तिने ऑलिम्पिकसाठी आपलं वजन कमी करत 50 किलो वजनी गटातून फायनलपर्यंत धडक मारली होती. फायनलपूर्वी जेव्हा तिचं वजन मोजण्यात आलं, तेव्हा ते 100 ग्रॅम जास्त भरलं होतं. यामुळेच तिला ऑलिम्पिकच्या नियमाप्रमाणे अपात्र घोषित करण्यात आलं.