Prithviraj Mohol : ‘ज्यांनी लंगोट घातला नाही, ते…’, कुस्ती पंच नितीश काबलिये निलंबन प्रकरणावर पृथ्वीराज मोहोळची प्रतिक्रिया
Prithviraj Mohol : शिवराज राक्षेवर अन्याय झाला, असं त्याच्या कोचच म्हणण आहे. त्यावरही पृथ्वीराज बोलला. "आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे 30 ते 40 सेकंद इतकावेळ कुणी कुस्ती थांबवू शकत नाही. 5 ते 10 सेकंद कुस्ती होल्ड करता येते. खालच्या पैलवानाची प्रतिक्रिया नसल्यामुळे त्यांनी शिट्टी वाजवली" असेल असं पृथ्वीराज म्हणाला.

आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेच्या कुस्ती सामन्याच्यावेळी चुकीचा निर्णय दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्यावतीने काबलियेंवर कारवाई करण्यात आली आहे. याच सामन्यानंतर शिवराज राक्षेनं काबलियेंना लाथ मारली होती. 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती अंतिम सामन्यातील निर्णयावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. अहिल्यानगर येथे ही कुस्ती स्पर्धा पार पडली होती. या कुस्ती स्पर्धेतील विजेता महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ या विषयावर टीव्ही 9 मराठीशी बोलला आहे.
“कुठल्याही खेळाडूला शिट्टी कानावर पडण्याची प्रतिक्षा असते. मी डाव मारुन मोकळा झालेलो. पंचांनी शिट्टी वाजवली म्हणून मी कुस्ती सोडून दिली. जर रेफरीने शिट्टी वाजवली नसती, दोन सेकंद थांबले असते, माझा पाय त्या पैलवानाच्या छातीवर होता. पंचांनी शिट्टी वाजवल्यामुळे मी सामना सोडून दिला, जल्लोष सुरु केला” असं पृथ्वीराज मोहोळने सांगितलं.
‘माझा डाव 100 टक्के बरोबर’
तुझा डाव बरोबर होता का? या प्रश्नावर पृथ्वीराज म्हणाला की, “माझा डाव बरोबर होता. होल्ड माझा होता. अख्खा महाराष्ट्र बघत होता. माझी होल्डवर प्रतिक्रिया होती. खालच्या पैलवानाची प्रतिक्रिया नव्हती” चौकशी समितीने पंचांना दोषी धरलय. पंचांचा निर्णय चुकीचा म्हणायचा का? “माझा डाव यशस्वी होता. कुस्ती संघटनेचा निर्णय आहे. आपण प्लेयर आहे. प्लेयरच काम लढणं आहे. माझा डाव 100 टक्के बरोबर होता”
या स्पर्धेसाठी पैलवान रक्ताच पाणी करतात
“पंचांनी शिट्टी वाजवल्यानंतर खेळाडूची काय चूक आहे. जे पैलवान नाही, ज्यांनी लंगोट घातला नाही, ते या वादाला ग्लो देत आहेत” असं मत पृथ्वीराजने व्यक्त केलं. परत कुस्ती सामना होणार म्हणत होते. तेव्हा मी म्हटलेलं, “मी तयार आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मी भरपूर तयारी केली होती. या स्पर्धेसाठी पैलवान रक्ताच पाणी करतात” असं पृथ्वीराज म्हणाला.