IND vs AUS: स्मिथने करुन दाखवलं; भारताविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात केला ‘हा’ दणदणीत रेकॉर्ड!
एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात प्रथम फलंदाजी करताना फिंच-वॉर्नर-स्मिथ आणि मॅक्सवेलच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 375 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये (Ind Vs Aus 2020) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार अॅरॉन फिंचचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. कर्णधार अॅरॉन फिंच आणि स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) या जोडीने दमदार शतके झळकावली तर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळी करत 19 चेंडूत 45 धावा फटकावल्या. फिंच-वॉर्नर-स्मिथ आणि मॅक्सवेलच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 375 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. (Steve Smith score 3rd fastest hundred for Australia; proves his statement right)
या सामन्यात सलामीवीर फिंच आणि वॉर्नरने अतिशय सावध सुरुवात करत 27 षटकांमध्ये एकही विकेट पडू दिली नाही. तोपर्यंत दोघांनीही आपापली अर्धशतके झळकावली होती. 28 व्या षटकात कांगारुंना पहिला धक्का बसला तो डेव्हिड वॉर्नरच्या रुपाने, 76 चेंडूंमध्ये 69 धावा करुन तो बाद झाला. त्यानंतर आलेल्या स्टिव्ह स्मिथने फिंचला चांगली साथ दिली. फिंच आज आक्रमक खेळताना दिसला. आजच्या सामन्यात त्याने त्याच्या कारकीर्दीतलं 17 वं शतक झळकावलं. फिंचने 124 चेंडूत 114 धावा केल्या.
फिंचपाठोपाठ स्टिव्ह स्मिथने दमदार खेळी करताना अवघ्या 66 चेंडूत 105 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीत त्याने 11 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार लगावले. स्मिथ आज खूपच आक्रमकपणे खेळत होता. त्याने कुठल्याही भारतीय गोलंदाजाची गय केली नाही. प्रत्येक गोलंदाजावर तुफान हल्ला चढवत पुन्हा एकदा स्वतःचा फॉर्म सिद्ध केला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलनेही चांगलीच आतषबाजी केली. त्याने 19 चेंडूंमध्ये 45 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
स्टिव्ह स्मिथने भारताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. स्मिथने या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी आपण फॉर्ममध्ये परतणार असल्याचे संकेत दिले होते. स्मिथ म्हणाला होता की, मी IPL 2020 मधील माझ्या परफॉर्मन्सबाबत निराश आहे. माझी लय थोडी बिघडली आहे. परंतु मी माझा फॉर्म दाखवेन. आजच्या सामन्यात त्याने त्याच्या कारकिर्दीतली अविस्मरणीय अशी खेळी करत त्याचा फॉर्म दाखवला. त्यामुळे स्मिथ जसं बोलला होता, तसं त्याने करुन दाखवलं, असंच म्हणावं लागेल.
सर्वात जलद शतक ठोकणारा तिसरा ऑस्ट्रेलियाई फलंदाज
ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जलद शतक ठोकण्याच्या बाबतीत स्मिथने रेकॉर्ड केला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जलद एकदिवसीय शतक ग्लेन मॅक्सवेलने ठोकलं आहे. त्याने 2014-15 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना 51 चेंडूत शतक ठोकलं होतं. त्याअगोदर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉकनरने 2013-14 मध्ये बंगळुरुमध्ये भारताविरुद्ध 57 चेंडूत शतक लगावलं होतं. सर्वात कमी चेंडूत शतक झळकावण्याच्या बाबतीत मॅक्सवेल आणि फॉकनरनंतर स्मिथचा नंबर लागतो. स्मिथने आज 62 चेंडूत शतक झळकावलं आहे.
संबंधित बातम्या
रात्रभर जागून BCCI चे नटराजन-इशांतबाबत मोठे निर्णय, रोहितच्या फिटनेसबाबत महत्त्वाची अपडेट
रोहित शर्माच्या दुखापतीवरुन गोंधळाचे वातावरण; विराट कोहलीची नाराजी
(Steve Smith score 3rd fastest hundred for Australia; proves his statement right)