पैलवान सुशील कुमार अद्यापही फरार, अटकेच्या बातम्या चुकीच्या
सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर आली होती. पण त्याला अजून अटक झाली नसल्याचं कळतंय.
नवी दिल्ली : दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या 23 वर्षीय सागर राणा हत्या प्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार अद्यापही फरार असल्याची माहिती मिळते. सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर आली होती. पण त्याला अजून अटक झाली नसल्याचं कळतंय. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारला पंजाबमध्ये बेड्या ठोकल्याचं सांगितलं जात होतं. सुशील कुमारसह त्याचा खासगी सचिव अजय कुमार यालाही पोलिसांनी अटक केली असल्याची बातमी समोर आली होती. पण ही बातमी चुकीची असल्याचं आता स्पष्ट झालंय. (Wrestler Sushil Kumar still absconding, news of arrest false)
सागर राणा हत्या प्रकरणात सुशील कुमार गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी इनामही जाहीर केलं होतं. सुशील कुमारच्या नावावर 1 लाख तर अजय कुमारवर 50 हजाराचं इनाम ठेवण्यात आलं होतं. सागर राणा याची हत्या झाल्यापासून कुस्तीपटू सुशील कुमार परागंदा आहे. त्याच्यासह अन्य आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. सुशील कुमार आणि त्याचे साथीदार अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यावर मानसिक दबावाखाली येतील, असा पोलिसांचा अंदाज होता. त्याच वेळी, अटकेपासून वाचण्यासाठी सुशील कुमारने कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. पण सुशील कुमारचा जामीन अर्ज रोहिणी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता.
सुशील कुमार विरोधात ठोस पुरावा
छत्रसाल स्टेडियमच्या CCTV फुटेजमध्येही सुशील कुमार आपल्या 20 ते 25 साथीदारांसह सागर राणा आणि दोन अन्य व्यक्तींना मारहाण करताना दिसून आलाय. या CCTV फुटेजमध्ये सुशील कुमार सागर आणि अन्य दोन व्यक्तींना हॉकी स्टिकने मारहाण करताना पाहायला मिळत आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबने हा व्हिडीओही खरा असल्याचं म्हटलंय. दरम्यान, सुशील कुमार मेरठ टोल नाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचंही दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.
Sushil Kumar was seen at Meerut toll plaza: Delhi Police
Read @ANI Story | https://t.co/yOUydnODuI pic.twitter.com/PhtasLESaV
— ANI Digital (@ani_digital) May 20, 2021
नेमकं प्रकरण काय?
मयत पैलवान सागर राणा हा आपल्या मित्रांसोबत छत्रसाल स्टेडियमजवळील मॉडेल टाऊन परिसरातील एका घरात राहत होता. ही जागा रिकामी करण्यावरुन गेल्या मंगळवारी (4 मे) मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी आणि गोळीबारही झाल्याचा आरोप आहे. यावेळी सुशील कुमारही उपस्थित असल्याचा दावा पीडितांनी केला आहे.
जखमी पैलवानांपैकी सागर राणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर काही जण जखमी आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरुन स्कॉर्पिओ कार आणि बंदूक मिळाली आहे. त्यासोबतच पोलिसांनी जिवंत काडतुसंही जप्त केली आहेत. याआधीही पैलवानांच्या गटात प्रॉपर्टीवरुन वाद झाल्याची माहिती आहे.
कोण आहे सुशील कुमार?
सुशील कुमार हा भारताकडून दोन वेळा वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा एकमेव अॅथलीट आहे. 37 वर्षीय सुशील कुमारने 2012 च्या लंडन ऑलिम्पिक्समध्ये रौप्य, तर 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. 2008 मध्ये सुशील कुमारने जिंकलेलं पदक हे खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक्समध्ये कुस्ती प्रकारात भारताने पटकवलेलं दुसरं पदक होतं. त्याला 2009 मध्ये राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा सन्मानाने गौरवण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या :
Sushil Kumar चा पाय खोलात, अटकेपासून वाचण्यासाठी कोर्टात धाव, पोलिसांकडून एक लाखाचं बक्षीस
Wrestler Sushil Kumar still absconding, news of arrest false