ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक मग शानदार विजय, तरीही रोहित शर्मा दु:खी, नक्की काय झालं?
India Won First Test Against Australia: भारतानं पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माची शतकी खेळी महत्त्वाची ठरली. असं असूनही रोहित शर्मानं एक दु:ख बोलून दाखवलं.
मुंबई- बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर (India Vs Australia Test) दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला.भारतानं या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.अजून भारताला तीन कसोटी सामने खेळायचे बाकी आहे. असं असलं तरी या विजयासह भारतानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधलं (World Test Championship) आपलं दुसरं स्थान कायम ठेवलं आहे.पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मानं कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. पहिल्या डावात 212 चेंडूत 120 धावांची खेळी केली. यात 15 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या खेळीमुळे भारताला पहिल्या डावात 223 धावांची भक्कम स्थिती मिळाली होती. सामन्यानंतर रोहित शर्माला या खेळीबाबत विचारलं असता त्याने आपल्या अंदाजात उत्तर दिलं. तसेच आपलं एक दु:खही बोलून दाखवलं.
काय म्हणाला कर्णधार रोहित शर्मा
“बऱ्याच गोष्टींचा विचार करता हे शतक खास होतं. चॅम्पियनशिप टेबलमध्ये कुठे आहोत हे पाहून मालिकेची आश्वासक सुरुवात हवी होती.मी आनंदी आहे की, माझ्या कामगिरीमुळे संघाला फायदा झाला. पण दुसरीकडे, दु:ख होतं की मी काही कसोटी सामने खेळू शकलो नाही. मला दुर्दैवाने काही कसोटी सामन्यांना मुकावे लागले. पण संघात पुनरागमन केल्याचा आनंद होत आहे.कसोटी संघाचं कर्णधारपद मिळाल्यानंतर मी फक्त दोन कसोटी खेळलो. इंग्लंडमध्ये कोविड झाला आणि दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांना मुकावं लागलं. त्यानंतर दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध खेळलो नाही. त्यामुळे दु:ख नक्कीच होतं.पण मला यापूर्वी दुखापती झाल्या आहे. त्यातून मी तसंच कमबॅक देखील केलं आहे.”, असं कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं.
कर्णधार रोहित शर्माचा विक्रम
रोहित शर्मा हा भारताच्या तिन्ही क्रिकेट फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून शतक झळकावणारा रोहित हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी हा पराक्रम श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशान,पाकिस्तानचा बाबर आझम आणि दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिसच्या नावावर आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शतकासह सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.कांगारूंविरुद्ध सलामीला येत सर्वाधिक शतक ठोकण्याच्या यादीमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे.रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत.
बॉर्डर गावसकर कसोटी स्पर्धा
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (दुसरा कसोटी सामना) – दिल्ली, भारत, 17-21 फेब्रुवारी
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तिसरा कसोटी सामना) – धर्मशाला, भारत, 1-5 मार्च
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चौथा कसोटी सामना) – अहमदाबाद, भारत, 9-13 मार्च
टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.