INDvsAFG: अफगाणिस्तानने दम काढला, भारताला 224 धावातच रोखलं
आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यासोबत झालेले तीन सामने टीम इंडियाने जिंकले आहेत.
India vs Afghanistan (इंग्लंड): विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या टीम इंडियाला दुबळ्या अफगाणिस्तानने चांगलंच तंगवलं. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला अफगाणिस्तानने 50 षटकात 8 बाद 224 धावातच रोखलं. त्यामुळे अफगाणिस्तानला विजयासाठी 225 धावांची गरज आहे.
या सामन्यात रोहित शर्मा अवघी 1 धाव करुन माघारी परतला. विराट कोहलीने 67 आणि केदार जाधवने 52 धावा केल्या. के एल राहुल 30, धोनी 28, विजय शंकरने 29 धावा केल्या. भारतीय संघ आज चाचपडत खेळली. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांचा चांगलाच घाम काढला. अफगाणिस्तानकडून गुलबदीन नाईब आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
विश्वचषकात अफगाणिस्तानवरच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. साऊदम्पटनच्या पाटा विकेटवर आज धावांचा पाऊस पडण्याचाअंदाज वर्तवण्यात येत होता. सलग तीन सामन्यात विजय मिळवलेल्या टीम इंडियाचा उत्साह दांडगा आहे. त्यापुढे दुबळ्या अफगाणिस्तानचं आव्हान आहे.
दरम्यान, भारतीय संघात दुखापदग्रस्त भुवनेश्वर कुमारऐवजी मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने विश्वचषकातील सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे आज अफगाणिस्तान विरुद्ध होणारा सामना टीम इंडिया जिंकेल असा विश्वास चाहत्यांना आहे.
आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यासोबत झालेले तीन सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. या सामन्यातील भारताची कामगिरी लक्षात घेता, आज अफगाणिस्तान विरोधात होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड आहे.
शिखर धवन बाहेर
दरम्यान, वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो तीन आठवड्यांसाठी संघाबाहेर झाला होता. पाकिस्तानविरुद्ध 16 जून रोजी झालेल्या सामन्यातही तो खेळू शकला नव्हता. धवनऐवजी विजय शंकरला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. आता धवन संपूर्ण स्पर्धेतूनच बाहेर पडला आहे. त्यामुळे भारत पाचव्या सामन्यातही शिखर धवनशिवाय उतरणार आहे.
भुवी दुखापतग्रस्त
तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारही दुखापतग्रस्त झाल्याने या सामन्यात खेळणार नाही. तो आठ दिवसांपर्यंत खेळू शकणार नाही. भुवी सध्या फिजिओंच्या देखरेखीत आहे. येत्या 30 जूनला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भुवी खेळण्याची अपेक्षा आहे. भुवनेश्वरच्या जागी मोहम्मद शमीचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.
धवनऐवजी विजय शंकरचा संघात समावेश
भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तो विश्वचषकातून बाहेर झाला आहे. त्यानंतर त्याच्या जागी रिषभ पंतला संघात स्थान मिळालं. पाकिस्तानसोबतच्या सामन्यात के.एल. राहुलने धवनच्या स्थानावर रोहित शर्मासोबत ओपनिंग केली. तर विजय शंकरला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून संघात समाविष्ट करण्यात आलं.
दरम्यान सध्या हिट मॅन रोहित शर्मा चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंतच्या तीन सामन्यातील दोन सामन्यात शतकी खेळी केली आहे. तर एका सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यातही रोहित शर्माचा हा फॉर्म कायम असणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अफगाणिस्तानची कामगिरी
विश्वचषकात अफगाणिस्तानने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यातील एकही सामन्यात विजय मिळवलेला नाही. अफगाणिस्तानची फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण फार निराशाजनक आहे. त्यामुळे भारताचे या सामन्यावर वर्चस्व राहिल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
वनडे क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि अफगाणिस्तान दोनदा आमनेसामने आले आहेत. यातील एक सामना भारताने जिंकला असून एक सामना टाय झाला होता.
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), केदार जाधव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, कुलदीप यादव
अफगाणिस्तान: गुलबदीन नैब (कर्णधार), नूर अली जादरान, हजरतुल्लाह जादरान, असगर स्टानिकजाई, हजरतुल्लाह जाजई, हसमतुल्लाह जादरान, राशिद खान, दौलत जादरान, अफताब आलम, हामिद हसन, मुजीब उर रहमान, रहमत शाह, समिउल्लाह शिनवारी, मोम्मद नबी, मोहम्मद शाहजाद, इकराम अली (विकेटकीपर).