Apple, Amazon, Facebook, Google च्या प्रमुखांवर गंभीर आरोप, अमेरिकेच्या संसदेत सर्वांची झाडाझडती
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील चार सर्वात मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखांवर गंभीर आरोप झाले आहेत (Investigation of Google Facebook Amazon Apple).
न्यूयॉर्क : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील चार सर्वात मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखांवर गंभीर आरोप झाले आहेत (Investigation of Google Facebook Amazon Apple). यात अॅपल (Apple), अॅमेझॉन (Amazon), फेसबूक (Facebook), गुगल (Google) या कंपन्यांचा समावेश याहे. त्यांच्यावर आपल्या शक्तीचा गैरवापर करुन प्रतिस्पर्ध्यांना चिरडून टाकल्याचा आरोप आहे. या आरोपांनंतर या चारही कंपन्यांच्या प्रमुखांना बुधवारी (29 जुलै) अमेरिकेच्या संसदेसमोर हजर रहावे लागले. यावेळी अमेरिकन संसदीय समितीने त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
चारही कंपन्यांचे प्रमुख सुंदर पिचाई (गूगल), जेफ बेजॉस (अॅमेझॉन), टिम कुक (अॅपल) आणि मार्क जकरबर्ग (फेसबुक) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अमेरिकेच्या संसदीय समितीसमोर हजर राहिले. यावेळी या समितीतील सदस्यांनी या सर्वांवर प्रश्नांची सरबत्ती केली. चारही कंपन्यांच्या प्रमुखांना अनेक कठोर प्रश्नांचा सामना करावा लागला. रिपब्लिकन आणि डेमोक्रेट्स अशा दोन्ही पक्षाच्या सदस्यांकडून चारही कंपन्यांवर प्रश्नांचा पाऊस पडला. या सर्वांवर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वेगवेगळे आरोप आहेत. या सर्वांची संसदीय समितीने एकत्रित सुनावणी सुरु केली आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
अमेरिकन संसदीय समितीचे अध्यक्ष डेव्हिड सिसिलाईन (डेमोक्रेट) म्हणाले, “या प्रकरणात एक वर्षापासून तपास सुरु आहे. यात संबंधित कंपन्यांनी त्यांच्या विस्तारासाठी आपल्या शक्तीचा विध्वंसक उपयोग केला. त्यांनी बाजारात आपली एकाधिकारशाही तयार व्हावी म्हणून प्रतिस्पर्ध्यांना चिरडून टाकलं. त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे.”
अमेरिकन संसदेत झालेल्या या सुनावणीत समितीच्या सदस्यांनी गुगलवर कंटेन्ट चोरीचा आरोप लावला. यानुसार गुगल आपल्या वापरकर्त्यांना आपल्या वेबपेजवर टिकवून ठेवण्यासाठी Yelp सारख्या छोट्या फर्म्सचा कंटेन्ट चोरत असल्याचा आरोप आहे. दुसरीकडे सुंदर पिचाई (गूगल), जेफ बेजॉस (अॅमेझॉन), टिम कुक (अॅपल) आणि मार्क जकरबर्ग (फेसबुक) यांनी हे आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं. आम्ही सर्व गोष्टी अमेरिकेची मुल्य लक्षात घेऊनच करत असल्याचा दावा केला.
आमच्या कंपन्यांच्या उत्पादनांचा इतर छोट्या कंपन्यांनाच फायदा होत आहे, असंही या कंपन्यांच्या प्रमुखांनी म्हटलं. तसेच आजही आपण नव्याने येणाऱ्या उद्योजकांसाठी स्पर्धेत असल्याचं त्यांनी नमूद केलं. अॅपलचे प्रमुख टिम कूक म्हणाले, “व्यवसायाचं वातावरण नेहमीच स्पर्धेचं असतं. स्मार्टफोन्सच्या व्यवसायात बाजार समभाग (मार्केट शेअर) नेहमीच रस्त्यावरील लढाईसारखे राहिले आहेत.”
हेही वाचा :
पुन्हा फेसबुकच्या 26 कोटी युजर्सचा डेटा लीक
अनेक भारतीय युजर्सचा डेटा लीक, गुगल क्रोमकडून पासवर्ड बदलण्याचा सल्ला
ट्विटरच्या CEO चे अकाऊंट हॅक, मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा
Investigation of Google Facebook Amazon Apple