..याला मोबाइलचा इंचू चावला! 12 वर्षाच्या मुलाला झोपच येत नाही, पोलिसांनीही समजावले, पालक हतबल!
मुलाचे व्यसन सोडवण्यासाठी आईने त्याच्या मावशीकडेही पाठवले. पण तेथेही या मुलाने तोच हट्ट कायम ठेवला. शेवटी मावशीनेही कंटाळून त्याला परत घरी पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली.
औरंगाबाद: आधीच आधुनिक तंत्रज्ञानाकडे लहान मुलांचा वाढता ओढा आणि त्यात कोरोनाची घरबंदी, यामुळे लहान मुलांना मोबाइलवाचून पर्यायच उरला नाही. गेल्या दीड वर्षात मुलांचे मोबाइल वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून मुलांच्या हातातील मोबाइल कसा सोडवायचा (Mobile addiction), या समस्येने पालकही हैराण आहेत. औरंगाबादमध्येही (Aurangabad) असाच एक प्रकार समोर आलाय. मोबाइल हातात दिल्याशिवाय एका 12 वर्षाच्या मुलाला झोपच येत नाही. ही सवय मोडण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी अनेक प्रयत्न केले. पण अजून त्यांना यावर उपाय सापडलेला नाही.
दीड वर्षापासून बळावली सवय
शहरातील बीड बायपास परिसरात पती-पत्नीसह त्यांचा मुलगा व एक मुलगी असे कुटुंब राहते. पती सुरक्षारक्षक म्हणून खासगी कंपनीत नोकरी करतो. पत्नी एका खासगी कंपनीत नोकरी करते. या दाम्पत्याची एक मुलगी बारावीला आहे. तर लहान मुलगा सहावीत आहे. मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे हा मुलगा ऑनलाइनच अभ्यास करतो. या काळातच त्याला मोबाइलचे प्रचंड वेड लागले. त्याचे हे वेड कमी करण्यासाठी आई-वडिलांनी त्याला अनेक प्रकारे समजावून सांगितले. पण त्याचा काहीही परिणाम होत नाही.
मोबाइल न दिल्यास चिडचिड, संताप
आई-वडिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, या मुलाला 24 तास हातात मोबाइल लागतो. मोबाइल घेतला तरच तो शांत बसतो. अन्यथा चिडतो, रडतो. हातात येईल त्या वस्तूने समोरच्याला मारतो. पोलिसांनी धमकावले तर काही सुधारणा होईल, या अपेक्षेने आई-वडिलांनी त्याची तक्रार शहरातील दामिनी पथकाकडे आपली व्यथा मांडली.
व्यसन सोडवण्यासाठी मावशीकडेही पाठवले
मुलाचे व्यसन सोडवण्यासाठी आईने त्याच्या मावशीकडेही पाठवले. पण तेथेही या मुलाने तोच हट्ट कायम ठेवला. शेवटी मावशीनेही कंटाळून त्याला परत घरी पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दामिनी पथकाने घातली समजूत
मोबाइलचे व्यसन लागलेल्या या 12 वर्षाच्या मुलाच्या आईने दामिनी पथकाला फोन करून आपले गाऱ्हाणे सांगितले. त्यानुसार दामिनी पथकातील उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, पोलीस नाईक निर्मला निंभोरे, आशा गायकवाड, साक्षी संगमवाड, संगीता दांडगे यांच्या पथकाने संबंधित कुटुंबाच्या घरी भेट दिली. या पथकाने मुलाची समजूत काढली. त्याला विश्वासात घेऊन मोबाइलचे धोकेही समजावून सांगितले. मात्र त्यात कितपत सुधारणा होईल, याबाबत पोलिसांनाही शंका आहे.
व्यसन कसे वाढत गेले, याचा अभ्यास करून उपाय हवे
मोबाइलच्या आहारी गेलेल्या अनेक मुलांच्या समुपदेशनासाठी मनासोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जाते. मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन लागू शकते. त्यात आता मोबाइलचत्या व्यसनाची भर पडली आहे. हे व्यसन पूर्ण करण्यासाठी ते काहीही करण्याची तयारी ठेवतात. त्यामुळे मुले मोबाइलकडे कोणत्या कारणासाठी आकर्षित झाले, याचा अभ्यास करून त्यांचे व्यसन संपवण्यासाठी उपाय शोधावे लागतील. मुलांची ही स्थिती हळूवारपणे हाताळावी लागते, असा सल्ला शहरातील मानसोपचारतज्ज्ञ रश्मीन आंचलिया यांनी दिला आहे.
इतर बातम्या-