एकाच फोनमध्ये दोन सिमकार्ड वापरताय तर येऊ शकता अडचणीत
अनेक जण एकाच फोनमध्य दोन सिमकार्ड वापरतात. अनेकांच्या मोबाईलमध्ये गरज नसताना देखील दोन सिमकार्ड आहेत. अनेक देशांमध्ये एकच सिम कार्ड वापरण्यास परवानगी आहे. आता भारतात देखील याबाबत कडक पाऊले उचलली जाऊ शकतात.

स्मार्टफोन आता प्रत्येकाच्या हातात दिसू लागला आहे. काही वर्षांआधी मोबाईल फोन असणे ही खूप मोठी गोष्ट मानली जायची. तेव्हा तर कॉल चार्जेस देखील भरपूर होते. त्यामुळे लोकं मोजकंच बोलून फोन ठेवायचे. आता मात्र स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. चार्जेस कमी असल्याने आता तो प्रत्येकाच्या खिशाला परवडतोय. अनेक लोकं तर एका फोनमध्ये दोन दोन सिम वापरत आहेत. पण जर तुम्ही देखील ही गोष्ट करत असाल तर तुमच्यासाठी ही बॅडन्यूज आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने दोन सिम संदर्भात एक प्रस्ताव तयार केला आहे. एकाच फोनमध्ये दोन सिमकार्ड वापरणाऱ्यांवर ट्राय दंड आकारणार आहे.
फोन नंबरचा गैरवापर रोखण्यासाठी ट्राय हा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे फोनमध्ये दोन सिम वापरत असाल तर काळजी घ्यावी लागणार आहे. काही लोक कोणतीही गरज नसताना देखील त्यांच्या फोनमध्ये दोन सिम कार्ड ठेवतात. नवीन अहवालानुसार ट्राय लवकरच सिम कार्ड नियम बदलू शकते. जर कोणी फोनमध्ये दोन सिमकार्ड कोणत्याही गरजेशिवाय वापरत असेल तर त्याच्याकडून अतिरिक्त शुल्क घेतले पाहिजे. हे शुल्क मासिक किंवा वार्षिक असू शकते.
219 दशलक्षाहून अधिक मोबाइल क्रमांक निष्क्रिय
जर तुम्ही एकच सिम वापरत असाल आणि तुमच्या फोनमध्ये दोन सिम इन्स्टॉल असतील तर तुम्हाला लवकरच अतिरिक्त पैसे द्यावे लागू शकतात. ट्रायच्या आकडेवारीनुसार, सध्या 219 दशलक्षाहून अधिक मोबाइल नंबर बऱ्याच काळापासून असक्रिय आहेत. हे मोबाईल क्रमांक ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहेत.
ट्रायच्या म्हणण्यानुसार, बहुतेक लोक दोन सिमकार्ड फोनमध्ये टाकतात. पण त्यातला एकच वापरला जातो. त्यामुळे जर एकच सिम वापरले तर टेलिकॉम कंपन्यांना नंबरची कमतरता भासणार नाही. ट्रायच्या म्हणण्यानुसार जगातील अनेक देशांमध्ये एकच सिमकार्ड वापरण्याचा नियम लागू आहे. ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, बेल्जियम, फिनलंड, ब्रिटन, लिथुआनिया, ग्रीस, हाँगकाँग, बल्गेरिया, कुवेत, नेदरलँड, स्वित्झर्लंड, पोलंड, डेन्मार्क या देशांमध्ये फक्त एकच सिमकार्ड वापरण्याची परवानगी आहे.