अजित पवार
अजित पवार हे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाचे राजकारणीही आहेत. अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. राज्यात सर्वाधिक वेळा म्हणजे पाच वेळा उपमुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 1991पासून अजितदादा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढवली होती. अजितदादा यांनी सर्वात आधी 2019मध्ये राष्ट्रवादीत बंड केलं होतं. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करून पहाटेच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावेळी त्यांना बहुसंख्य आमदारांनी पाठिंबा दिला होता. मात्र, शरद पवार यांनी त्यांचं हे बंड मोडून काढलं. तीन दिवसातच अजितदादांनी राजीनामा दिला आणि परत स्वगृही परतले होते. त्यानंतर अजितदादा यांनी राष्ट्रवादीत पुन्हा एकदा बंड केलं. 40 आमदारांना घेऊन ते राष्ट्रवादीतून बाहेर पडले. त्यांनी शिंदे गट आणि भाजपशी युती केली असून महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. 2 जुलै 2023 पासून ते महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. 2022-23 या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर देखील हक्क सांगितला आहे. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. सध्या हे प्रकरण निवडणूक आयोगात प्रलंबित आहे.