भाजप
भारतीय जनता पार्टी हा देशातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून 2014 पासून केंद्रात सत्तेत आहे. त्याशिवाय देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. 1980मध्ये भाजपची स्थापना झाली. 1984मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या केवळ दोनच जागा निवडून आल्या. त्यानंतर राम मंदिर आंदोलन सुरू झालं. त्यामुळे भाजपला नवी उभारी मिळाली. 1996मध्ये राम मंदिर आंदोलनामुळे भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची स्थापना झाली. त्यानंतर 2004 पर्यंत भाजप सत्तेत राहिली. नंतर दहा वर्ष भाजप सत्तेपासून दूर होती. पण मुख्य विरोधी पक्ष भाजपच होता. 2014ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली. या निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळालं. मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतरही 2019च्या निवडणुकीत भाजपने मोठं यश संपादन करून सत्ता मिळवली. केंद्रातील सत्ता काळात भाजपने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. नोटाबंदी, जीएसटी लागू करणे, पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवणे आणि तीन तलाकबाबतचे निर्णय भाजपने घेतले.