देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे भाजपचे आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर व्यवसाय व्यवस्थापनात स्नातकोत्तर पदवी आणि डी. एस. ई. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती आणि तंत्र या विषयात पदविका मिळविली. फडणवीस यांनी नव्वदीच्या दशकात राजकारणात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी मोठा जनाधार प्राप्त केला. नागपूर महानगरपालिकेतून ते सलग दोनदा (1992 आणि 1997) निवडून आले. नागपूरचे महापौर पद त्यांनी भूषविले असून भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. महापौरपदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेअर इन काऊन्सिल’चा मान मिळविणारे ते पहिलेच नेते आहेत. 1999 ते आतापर्यंत सलग पाचवेळा फडणवीस आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. यापूर्वी त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. सध्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री (Deputy CM of Maharashtra) आणि गृहमंत्री (Home Minister of Maharashtra) म्हणून कार्यरत आहेत.