स्वातंत्र्य दिन 2024
15 ऑगस्ट, 1947 हा भारतासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र राष्ट्र बनलो. सुरुवातीला, ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट एटली यांनी 30 जून, 1948 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. मात्र, देशातील वाढती अस्थिरता आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे ही तारीख पुढे ढकलण्याची गरज भासली. त्यामुळे, 3 जून 1947 रोजी भारताचे शेवटचे व्हॉइसराय लॉर्ड माउंटबॅटन यांनी एक नवी योजना मांडली. त्यात, 15 ऑगस्ट, 1947 रोजी भारतला स्वातंत्र्य देणे, ब्रिटिश भारतचे विभाजन करून भारत आणि पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण करणे, दोन्ही देशांना स्वायत्तता आणि संप्रभुता देणे आणि भारतातील संस्थाने कोणत्या देशात विलीन होतील, हा निर्णय त्यांना स्वतःला घेण्याचा अधिकार देणे आदीचा समावेश होता. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 4 जुलै 1947 रोजी लॉर्ड माऊंटबॅटन यांनी इंडियन इंडिपेंडन्स बिल मांडलं. माउंटबॅटन योजनेला ब्रिटिश संसदेची मंजूरी मिळाली आणि 4 जुलै 1947 रोजी इंडियन इंडिपेंडेंस बिल मंजूर करण्यात आले. या बिलाद्वारे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देणार असल्याची घोषणा करण्यात आली.