शरद पवार
शरद पवार हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे नेते आहेत. पवार हे महाराष्ट्राचे चारवेळा मुख्यमंत्री होते. केंद्रातील पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत. तसेच राज्यातील महाविकास आघाडीचे ते शिल्पकारही आहेत. महाराष्ट्रातील प्रभावशाली राजकीय कुटुंब असलेल्या पवार कुटुंबातील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक प्रमुख चेहरा आहेत. कुटुंबातील इतर राजकारण्यांमध्ये त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, पुतण्या अजित पवार आणि नातू रोहित पवार हे राजकारणात सक्रिय आहेत. शरद पवार यांनी 2005 ते 2008 पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. 2010 ते 2012 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. ऑक्टोबर 2013 ते जानेवारी 2017 या कालावधीत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. कुस्ती या खेळालाही मानाचं स्थान निर्माण करून देण्यात शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. भारत सरकारने त्यांना 2017 मध्ये पद्मविभूषण हा भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे.